तलाठ्यांना आता गावात उपस्थिती वेळापत्रकाचे बंधन ……… वाचा सविस्तर….

बुलडाणा :- सध्या एका तलाठ्याकडे दोन किंवा त्यापेक्षा अधिक गावांची जबाबदारी आहे. त्यामुळे ते कोणत्या दिवशी गावात येणार याची माहिती गावकऱ्यांना नसल्याने विनाकारण त्यांना हेलपाटे मारावे लागतात. त्यामुळे आता तलाठ्यांना नियोजित दौरा, बैठका व कार्यक्रमांची माहिती असलेले उपस्थिती वेळापत्रक ग्रामपंचायतीबाहेर दिसेल असे ठळकपणे लावण्याचे आदेश महसूल विभागाने दिले आहेत.
राज्याच्या महसूल खात्यात १५ हजार ७४४ तलाठ्यांची पदे मंजूर आहेत. पण, त्यातील पाच हजार ३८ पदे रिक्त असून आता चार हजार ६४४ पदांची भरती सुरु आहे. नवीन तलाठी रुजू होईपर्यंत एका तलाठ्याकडे अनेक सज्जांचा कार्यभार राहणार आहे. दरम्यान, तलाठी हा गाव स्तरावरील नागरिकांसाठी महत्त्वाचे पद आहे.विविध प्रकारचे दाखले, उतारे देणे, जमिनीच्या नोंदी घेणे यासह पीक पाहणी, दुष्काळ, अतिवृष्टीसह अन्य नैसर्गिक आपत्तीत पंचनामे करण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका असते. तरीदेखील तलाठी सज्जाच्या ठिकाणी राहत नसल्याच्या तक्रारी लोकप्रतिनिधींसह नागरिकांकडून सरकारपर्यंत पोचल्या होत्या.या पार्श्वभूमीवर महसूल विभागाने स्वतंत्र परिपत्रक काढून तलाठ्यांना त्यांचे दररोजचे वेळापत्रक गावातील इतर शासकीय इमारतीवर दर्शनी भागात लावण्याचे आदेश दिले आहेत. त्यावर स्वत:बरोबरच मंडळ अधिकारी व नायब तहसीलदारांचे मोबाईल क्रमांक टाकावेत, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.
[ नागरिकांना करता येईल वरिष्ठांकडे तक्रार ]
तलाठी दररोज सज्जाच्या ठिकाणी हजर राहत नसतील, आदेशानुसार वेळापत्रक लावत नसतील तर नागरिकांना मंडळ अधिकारी, नायब तहसीलदारांकडे तक्रार करता येईल. शेवटी उपजिल्हाधिकारी, जिल्हाधिकाऱ्यांकडेही जाता येईल. तत्पूर्वी, महसूल विभागाच्या आदेशानुसार प्रत्येक तलाठ्यांना दररोज त्यांचे वेळापत्रक (दौरा, बैठका) मंडळ अधिकारी व नायब तहसीलदारांना पाठविण्याचे बंधन घालण्यात आले आहे.आदेशातील ठळक बाबी…तलाठी भरती होईपर्यंत तलाठ्यांनी त्यांचे दररोजचे नियोजन ग्रामपंचायतीसमोर लावावे.तलाठ्यांनी सज्जा कार्यालयाच्या ठिकाणी उपस्थित राहण्यासंबंधीचे वेळापत्रक निश्चित करून तेही लावावे.तलाठ्यांनी स्वत:बरोबरच मंडळ अधिकारी व तहसीलदारांचा दूरध्वनी क्रमांक देखील त्याठिकाणी लावावा.जनतेची कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नाही याची प्रत्येक तलाठ्यांनी दक्षता घ्यावी.शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांची कामे मुदतीपेक्षा जास्त दिवस प्रलंबित राहणार नाहीत, याची खबरदारी घ्यावी