Homeबुलढाणा (घाटावर)बुलढाणा घाटाखाली

शेतीसाठी उपयुक्त ठरणाऱ्या योजना प्रभावीपणे राबविणार -जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील

फळबाग क्षेत्र दुप्पट करण्याचे लक्ष वैरण विकासाचा उपक्रम राबविणार

Spread the love

 

बुलढाणा- आपलं बुलढाणा जिल्‍हा बातमी : शेतीच्या शाश्वत विकासासाठी उपयुक्त ठरतील अशा योजना आणि उपक्रम एकत्रितपणे राबविल्यास शेतीच्या उत्पादकतेत निश्चितपणे वाढ होण्यासाठी मदत होणार आहे. त्यामुळे येत्या काळात शेतीशी निगडित सर्व योजना प्रभावीपणे राबविण्यात याव्यात, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयात कृषी विभागाची आढावा बैठक गुरुवारी, दि. 22 सप्टेंबर घेण्यात आली. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मनोज ढगे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी बी. एम. मोहन, जिल्हा नियोजन अधिकारी सुनय लाड आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डॉ. पाटील यांनी यावर्षीच्या खरीप हंगामाचा आढावा घेतला. जिल्ह्यात सोयाबीन आणि कापूस ही महत्त्वाची पिके असून या पिकावरील प्रादुर्भावाची माहिती घेतली. तसेच यावर करावयाच्या उपायोजनांबाबत शेतकऱ्यांना माहिती देण्यात यावी, असे सागितले. जिल्ह्यातील सध्याची पावसाची स्थिती पाहता येत्या काळात चाराटंचाई जाणवणार नाही, यासाठी आतापासूनच नियोजन करणे आवश्यक आहे. वैरण विकास कार्यक्रमांतर्गत चाऱ्याच्या सुधारीत वाणांचा वापर करणे गरजेचे आहे. यासाठी जिल्हा परिषदेने अधिकचा निधी घेऊन वैरणासाठी उपलब्ध करून देण्याच्या सूचना त्यांनी केल्या.
शेतीसाठी पाण्याची उपलब्धता राहावी, यासाठी बांध-बंधिस्त करणे गरजेचे आहे. तसेच येत्या काळात जलयुक्त शिवार, वनराई बंधारे, नदी-नाले, तलाव खोलीकरण करणे आवश्यक आहे. पाणी अडवण्यासाठी जिल्ह्यात पाच हजार वनराई बंधारे बांधण्याचे नियोजन करावे. हे बंधारे श्रमदानातून बांधण्यासाठी सेवाभावी संस्थांची मदत घेण्यात यावी. तसेच तलाव, नदी आणि नाल्यातील गाळ काढून शेतीमध्ये टाकण्यासाठी घेऊन जाण्यासाठी नागरिकांना आवाहन करावे. जिल्ह्यात कृषी सौर योजना दोन हजार हेक्‍टरवर राबविण्यात येणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना दिवसा अखंडित वीज मिळण्यास मदत होणार आहे.
जिल्हा टंचाई मुक्त होण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. यासाठी रोजगार हमी योजनेतून कामे घेण्यात यावी. प्रत्येक गावात जलयुक्त शिवारचा उपक्रम राबविण्यात यावा. प्रामुख्याने खारपान पट्ट्यात शेततळे घेण्यात यावे. या शेततळ्यामध्ये मत्स्य व्यवसायासोबत मत्स्यबीज उत्पादनही घेण्यात यावे. शेततळ्यांना अस्तरीकरण करण्यात यावे. शेतीची उत्पादकता वाढवण्यासाठी ठिबक सिंचनाचा वापर वाढवण्यात यावा.
शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या विविध मदती आणि अनुदानाचे वाटप, तसेच लाभ मिळवण्यासाठी आवश्यक असणाऱ्या ई केवायसी अशा प्रलंबित बाबी सेवा सप्ताहामध्ये हाती घेऊन त्याचा मोठा प्रमाणावर निपटारा करावा. पीक विम्याचा लाभ घेण्यासाठी ई-पिक पाहणीला प्रोत्साहन देण्यात यावे. प्रत्येक शेतकऱ्याने नुकसानीचा फोटो काढून अपलोड करावा. शेतकऱ्यांना पीक विम्याचा फायदा होण्यासाठी पावसाच्या खंडाची माहिती कळविण्यात यावी. विमा कंपन्या ह्या शेतकऱ्यांना मदत देण्यास अनुत्सुक असल्याने पीक विम्याचा लाभ मिळण्यासाठीच्या आवश्यक कार्यवाही तातडीने करण्यात याव्यात.
जिल्ह्यात विविध उपक्रम राबविल्यानंतर पाण्याची उपलब्धता होत असल्यास जिल्ह्यात संत्रा आणि सिताफळ या पिकांचे क्षेत्र दुप्पट करण्याचे लक्ष ठेवण्यात यावे. तसेच उत्पादकता दीडपट वाढवण्याचे लक्षांक ठेवावे. शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या मालाला योग्य भाव मिळण्यासाठी शेतकरी गट, कंपनीची संख्या वाढवण्यासाठी प्रयत्न करावे.
सध्या भरडधान्याबाबत मोठ्या प्रमाणावर जनजागृती होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पारंपारिक पिके घेण्याऐवजी भरडधान्य घेण्यासाठी शेतकऱ्यांना उद्युक्त करावे. तसेच सेंद्रिय शेतीसाठीही मार्गदर्शन करण्यात यावे. जिल्ह्यातील शेती आणि शेतीपूरक उद्योगांसाठी नाविन्यपूर्ण सूचनाही देण्याचे आवाहन डॉ. पाटील यांनी यावेळी केले.
000000

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page