गणेश विसर्जन शांततेत होण्यासाठी उपाययोजना कराव्यात – जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील
गणपती उत्सवाबाबत कायदा व सुव्यवस्थेची बैठक
बुलढाणा- आपलं बुलढाणा जिल्हा बातमी-: जिल्ह्यात सर्वत्र सार्वजनिक गणेश उत्सव साजरा करण्यात येत आहे. हा उत्सव शांततेत पार पडण्यासाठी पोलिस विभागाने जिल्ह्याभरात बैठका घेतल्या आहे. मात्र तरीही गणेश विसर्जनाच्या दिवशी कायदा व सुव्यवस्थेची कोणतीही परिस्थिती उद्भवू नये, यासाठी उपाययोजना कराव्यात, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ किरण पाटील यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात गुरुवार, दि. 21 सप्टेंबर रोजी गणेश विसर्जनानिमित्त बैठक घेण्यात आली. यावेळी जिल्हा पोलिस अधीक्षक सुनील कडासने, अप्पर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी, निवासी उपजिल्हाधिकारी शरद पाटील आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डॉ. पाटील म्हणाले, उत्सवाच्या काळात जिल्ह्यात सर्वत्र शांतता राहावी, यासाठी गणेश मंडळांच्या बैठका घेऊन सूचना देण्यात याव्यात. आगामी निवडणुका लक्षात घेता समाज विघातक प्रवृत्तीकडून बाधा होऊ नये, यासाठी तडीपारीच्या प्रकरणी निर्णय घेणे आवश्यक आहे. अशी प्रकरणेही निकाली काढण्यात यावी. तसेच या कालावधीत प्रतिबंधात्मक आदेशही काढण्यात यावा.
येत्या कालावधीत गणेश विसर्जन महत्त्वाचे राहणार आहे. त्या दृष्टिकोनातून गणेश विसर्जनाच्या स्थळाचे जिल्ह्यात व्यापक प्रसिद्धी करण्यात यावी. संबंधित नगरपालिकांच्या मुख्याधिकारी यांनी विसर्जन स्थळाची पाहणी करून त्या ठिकाणी सोयीसुविधा उपलब्ध करून द्याव्यात. तसेच या ठिकाणी फलक लावण्यात यावे. विसर्जनासाठी मार्ग निश्चित करून देताना रस्त्याच्या मध्ये दुभाजक टाकण्यात यावे. तसेच विसर्जन स्थळी ॲम्ब्युलन्स, क्रेन, लाईट आदीची व्यवस्था करण्यात यावी.
जिल्ह्यातील खामगाव शहर अतिसंवेदनशील असल्यामुळे या ठिकाणी कायदा व सुव्यवस्था अभिवाथित राखण्यासाठी कार्यवाही करण्यात यावी. तसेच वीज वितरण कंपनीला विसर्जन काळात अखंडित वीज पुरवठा करण्याबाबत दक्षता घेण्याच्या सूचना देण्यात याव्यात. तसेच मार्गावरील विजेच्या तारा सुस्थितीत करण्याची तातडीने कारवाई करावी. विसर्जन कालावधीत मिरवणुकीच्या मार्गावरील सर्व दुकाने बंद ठेवण्यात यावी. तसेच मिरवणुकीला अडचणीची होईल, असा कचरा, बांधकाम साहित्य त्या ठिकाणाहून हलविण्यात याव्यात, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.