चिखलीच्या मुलींच्या शासकीय वसतिगृहातील ६ मुलींना अन्नातून विषबाधा!
चिखली- आपलं बुलढाणा जिल्हा बातमी :- चिखली शहरातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर मुलींच्या शासकीय वसतिगृहात शिकणाऱ्या ६ मुलींना अन्नातून विषबाधा झाल्याचे समोर आले आहे. ६ मुलींना मध्यरात्री २ वाजता चिखली शहरातील एका खाजगी हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले आहे.
चिखली शहरात मुलींचे शासकीय वसतिगृह आहे. या वसतिगृहातील ६ मुलींना अत्यवस्थ अवस्थेत रात्री चिखलीतील खाजगी हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले. अळ्या पडलेले अन्न खाल्ल्यानेच या मुलींना विषबाधा झाल्याचे समोर येत आहे. विशेष म्हणजे या अन्नाचे फोटोच प्रसारमाध्यमाकडे प्राप्त झाले असून ते फोटो पाहूनच किळस येईल अशी स्थिती आहे, त्यामुळे अन्न खाल्ल्यामुळे काय झाले असावे याची कल्पनाच न केलेली बरी. दरम्यान हे प्रकरण माध्यमांसमोर येऊ नये यासाठी देखील प्रयत्न करण्यात येत आहे. हा प्रकार बाहेर कुणाला सांगितला तर खबरदार..अशी धमकीच हा वस्तीगृहाच्या प्रशासनातील एकाने दिल्याचे सूत्रांनी सांगितले. मुलींना शासकीय रुग्णालयात दाखल केले तर प्रकरणाचा भांडाफोंड होऊ शकतो म्हणूनच मुलींना खाजगी हॉस्पिटल मध्ये भरती करण्यात आले. सध्या मुलींवर उपचार सुरू आहेत,सर्व मुलींचे वय हे १७ वर्षांपेक्षा अधिक आहे.
सर्वच मुली शेतकऱ्यांच्या..
विषबाधा झालेल्या सर्वच मुली बुलडाणा जिल्ह्यातील असून शेतकऱ्यांच्या आहे. महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी त्या चिखलीतील शासकीय वसतिगृहात राहतात. “दादा आम्ही गरीब आहोत, २ हजार रुपये आम्ही मेसचे देऊ शकत नाही, खोली भाड्याने करून राहणे आम्हाला परवडत नाही..पण आम्हाला शिकायचे आहे. असे सांगताना एका मुलीच्या डोळ्यात अश्रू आले होते..