बुलढाण्यात शुक्रवारी ६ ऑक्टोंबरला दिव्यांग मेळावा
३ ऑक्टोबरपर्यंत नोंदणी सुरू राहणार
बुलढाणा- आपलं बुलढाणा जिल्हा बातमी- राहुल गवळी :- जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागातर्फे दिव्यांग कल्याण विभाग अपंगाच्या दारी राबविण्यात येत आहे. यात बुलडाणा येथे शुक्रवार, दि. 6 ऑक्टोबर 2023 रोजी दिव्यांगाचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. सहकार विद्या मंदिराच्या सांस्कृतिक सभागृहात हा कार्यक्रम होणार आहे.
समाज कल्याण विभागातर्फे ‘दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. चिखली रोडवरील सहकार विद्या मंदिराच्या सांस्कृतिक सभागृहात दि. 6 ऑक्टोंबर 2023 रोजी लाभार्थ्यांची आरोग्य तपासणी करुन विविध प्रकारची प्रमाणपत्रे आणि साहित्य वाटप करण्यात येणार आहे. कार्यक्रमाच्या आयोजनाबाबत जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटिल यांनी सदर कार्यक्रमात दिव्यांगांचा मेळावा घेवून त्यांना विविध योजनांचा लाभ देण्याच्या सूचना दिल्या आहे. यासाठी मेळाव्यात सर्व शासकीय विभागाचे स्टॉल उभारुन दिव्यांगासाठीच्या योजनांची माहिती दिली जाणार आहे. त्याचबरोबर पात्र दिव्यांगांची तपासणी करुन त्यांना प्रमाणपत्र दिले जाणार आहे. तसेच दिव्यांगांना साहित्याची गरज असल्यास त्यांना आवश्यकतेनुसार साहित्य देण्यात येणार आहे.
मेळाव्याला दिव्यांग कल्याण विभागाचे राज्य मार्गदर्शक आमदार बच्चू कडू उपस्थित राहतील. दिव्यांगांनी संबंधित पंचायत समिती अथवा नगरपालिका, नगर पंचायत येथे स्थापन केलेल्या कक्षात नाव नोंदणी करावी. ही नोंदणी दि. ३ ऑक्टोंबरपर्यंत सुरू राहणार आहे, दिव्यांग कल्याण विभागाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांनी आधारकार्ड, पॅनकार्ड, रेशनकार्ड आदी महत्वाची कागदपत्रे सोबत आणावीत, असे आवाहन जिल्हा समाज कल्याण अधिकारी मनोज मेरत यांनी केले आहे.