राजकीय इच्छाशक्तीअभावी विकास रखडला – संदीपदादा शेळके
शेलापूर येथे संवाद मेळाव्यातून राजकारण्यांवर साधला निशाणा
मोताळा : (आपलं बुलढाणा जिल्हा बातमी) – मोताळा हा अवर्षणग्रस्त तालुका आहे. या भागात सिंचनाच्या सोयी निर्माण करण्याची गरज आहे. मात्र राजकीय इच्छाशक्ती नसल्याने इतक्या वर्षांत सिंचनाच्या प्रश्नावर काम होऊ शकले नाही. त्याचे परिणाम शेतकरी, कष्टकरी, मजूर, कामगार, गोरगरीब जनतेला भोगावे लागत आहेत, असा घणाघात राजर्षी शाहू परिवाराचे अध्यक्ष संदीपदादा शेळके यांनी केला. तालुक्यातील शेलापूर येथे ६ ऑक्टोबर २०२३ रोजी वन बुलढाणा मिशनंतर्गत जाहीरनामा जनतेचा कार्यक्रमाच्या अनुषंगाने संवाद मेळावा संपन्न झाला. यावेळी ते बोलत होते. मंचावर वासुदेव महाराज शास्त्री, संजय किणगे, सुरेश सरोदे, अवि पाटील, सलीम भैय्या, जयंत चोपडे, सतीश रोठे, अशोक चव्हाण, सुरेश इंगळे, अमोल देशमुख, अशोक भोपळे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.शेलापूर गावातून रॅली काढण्यात आली. रॅलीत मोठ्या संख्येने ग्रामस्थ आणि पंचक्रोशीतील नागरिक सहभागी झाले होते. रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. बालगोपालांनी गुलाबपुष्प देऊन संदीपदादा शेळके यांचे स्वागत केले. ठिकठिकाणी माता- भगिनींनी औक्षण केले.
मायबापहो आतातरी जागे व्हा !
जनतेने लोकप्रतिनिधिंना प्रश्न विचारले पाहिजे. जोपर्यंत तुम्ही बोलणार नाही तोपर्यंत तुमचे प्रश्न सुटणार नाहीत. बाजारात भाजी घेतांना आपण चारदा विचार करतो. मग लोकप्रतिनिधी निवडतांना विचार का करीत नाही, असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला. अजून वेळ गेलेली नाही. योग्य व्यक्तीची निवड करा. मायबापहो आता तरी जागे व्हा, असे आवाहन संदीपदादा शेळके यांनी केले.
मोताळ्यात एमआयडीसी उभारण्यासाठी प्रयत्न करणार
जिल्ह्यात सात एमआयडीसी आहेत. त्यापैकी केवळ तीन सुरु आहेत. त्यामध्ये सुद्धा मोठे उद्योग नाहीत. पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांनी एमआयडीसीला प्राधान्य देत विकास साधला आहे. मला सेवेची संधी मिळाल्यास मोताळ्यात चांगली एमआयडीसी उभी करण्यास प्राधान्य राहील, अशी ग्वाही संदीपदादा शेळके यांनी दिली.