धोडप शिवारात बिबट्याची दहशत,बिबट्याने शेतकऱ्याचे गाईचे वासरू केले ठार.
चिखली – आपलं बुलढाणा जिल्हा बातमी :- तालुक्यातील धोडप येथे वन्य प्राण्याचा हैदोस सुरूच असून, बिबट्याने गावातील एका शेतकऱ्याचे गाईचे वासरू ठार केल्याची घटना उघडकीस आली आहे.
सविस्तर वृत्त असे की, धोडप येथील शेतकरी सतिष गुलाबराव कोल्हे यांच्या गावाला लागून असलेल्या गोठ्यात दोन म्हशी एक गाई व गोरा रात्री बांधलेल्या होत्या. सकाळी सतिष कोल्हे जेव्हा चारा पाणी करण्यासाठी गोठ्यात गेले तेव्हा त्यांना एक गाईचा गोरा बिबट्याने मारून टाकलेली आढळली बिबट्याच्या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहेत.
धोडप,डोंगरशेवली परिसरात अस्वल आणि बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. मागील पंधरा दिवसापूर्वी देव्हारी शिवारात बिबट्याच्या हल्ल्यात एका शेतकर्याचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच बिबट्याने धोडप येथील शेतकऱ्याचे एका गाईच्या गोरा ठार केल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात धोडप शिवारातील शेतकऱ्याचे जवळपास १० हजार रुपयाचे नुकसान झाले आहे. तर या वन्यप्राण्यांचा तात्काळ बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
या संदर्भात वन विभागाला वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करण्यासाठी लेखी तोंडी निवेदने देण्यात आली आहे परंतु यावर वन विभाग कुठल्याच स्वरूपाची कार्यवाही करतांना दिसून येत नाही. वन्य प्राण्यांचा हल्ल्याच्या घटना घडल्यावर नुसते कार्यवाही करण्याचे आश्वासन द्यायचे व वेळ मारून न्यायचा प्रकार सर्रास वन विभागाकडून सुरू आहे. आता तरी वन विभाग वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करणार का? असा प्रश्न आता शेतकरी वर्गाकडून उपस्थीत होत आहे.