अटल करंडक स्पर्धेत ‘अनपेक्षित’ने मारली बाजी
प्राथमिक फेरीत ५ पारितोषिकांसह सांघिक द्वितीय
बुलढाणा :-आपलं बुलढाणा जिल्हा बातमी- महाराष्ट्रातील अत्यंत प्रतिष्ठेच्या अटल करंडक एकांकिका स्पर्धेतील प्राथमिक फेरीत येथील “अनपेक्षित” या एकांकिकेने तब्बल पाच पारीतोषिके पटकावली असून एकांकिका उपविजेती ठरली आहे. अ. भा. मराठी नाट्य परिषदेच्या पनवेल (मुंबई) शाखेतर्फे दरवर्षी अटल करंडक एकांकिका स्पर्धेचे आयोजन करण्यात येते व महाराष्ट्रातील एकूण ९ केंद्रावर प्राथमिक फेरी घेण्यात येते. यंदा खान्देश व पश्चिम विदर्भासाठी २२ ऑक्टोबर रोजी जळगाव खान्देश येथील व. वा. वाचनालयाच्या सभागृहात प्राथमिक फेरी घेण्यात आली. यामध्ये स्थानिक माणुसकी मल्टिपर्पज फाऊंडेशनतर्फे शैलेंद्र टिकारीया लिखित व विजय सोनोने, गणेश देशमुख दिग्दर्शित ‘अनपेक्षित’ एकांकिका सादर करण्यात आली. एकूण आठ एकांकिकापैकी बुलढाण्याच्या अनपेक्षितने तब्बल पाच पुरस्कारांवर नाव कोरले असून स्पर्धेचे उपविजेतेपददेखील सदर एकांकिकेला प्राप्त झाले आहे. पुरस्कारांमध्ये लेखनाचे प्रथम पारितोषिक शैलेंद्र टिकारीया, स्त्री अभिनय प्रथम कु. कल्याणी काळे, दिग्दर्शन द्वितीय विजय सोनोने, पुरुष अभिनय द्वितीय पराग काचकुरे तर सांघिक द्वितीय माणुसकी मल्टिपर्पज फाऊंडेशनला प्राप्त झाले आहे. रोख रक्कम , स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप होते. स्पर्धेचे परीक्षक भरत सावळे, दिनेश गायकवाड, मुख्य संयोजक गणेश जगताप, अमोल खैर, अभिषेक पटवर्धन यांच्याहस्ते विजेत्यांना पारितोषिके प्रदान करण्यात आली. एकांकिकेत पराग काचकुरे, धनंजय बोरकर, पंजाबराव आखाडे, डॉ. स्वप्नील दांदडे, कु. कल्याणी काळे, प्रसाद दामले यांनी भूमिका केली. सिने अभिनेते ॲड. गणेश देशमुख यांच्या मार्गदर्शनात तांत्रिक बाजू अमितेश शहाणे, बंडू तवर यांनी सांभाळली. एकांकिकेला गणेश राणे, संतोष पाटील, शशिकांत इंगळे, लक्ष्मीकांत गोंदकर यांनी सहकार्य केले.