जिल्ह्यात दोन अपघातात ५ जणांचा बळी
एक अपघात सकाळी तर दुसरा अपघात रात्री...
बुलढाणा:- आपलं बुलढाणा जिल्हा बातमी- विजयादशमीच्या दिवशी बुलढाणा जिल्ह्यात चिखली-बुलढाणा मार्गावर केळवद नजीक झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातामध्ये पाच जण ठार झाले तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. गंभीर जखमीवर सध्या छत्रपती संभाजीनगर येथे उपचार करण्यात येत आहे. यातील पहिला अपघात २४ ऑक्टोबरला दुपारी घडला तर दुसरा अपघात रात्री नऊ वाजेच्या सुमारास घडल्याची माहिती पोलिससुत्रांनी दिली.
२४ ऑक्टोबर रोजी रात्री नऊ वाजेच्या सुमारास चिखली मार्गावर केळवद नजीकच्या घाटमाथ्यावर एका नर्सरीजवळ दोन दुचाकींची समोरासमोर धडक झाली. यात तिघांचा जागीच मृत्यू झाला. मृतामध्ये पतीपत्नीचा समावेश आहे. अपघातामधील एका जखमीला छत्रपती संभाजीनगर येथे हलविण्यात आले आहे. रात्री नऊ वाजेच्या सुमारास हा अपघात घडला.
केळवद नजीक हिवाळे नर्सरीनजीक हा अपघात होऊन दोन्ही चुकावरील चार जण गंभीर जखमी झाले. त्यांना स्थानिकांनी तत्काळ बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी हलविले. मात्र जखमीपैकी ज्ञानेश्वर मोतीराम जाधव (४०),भाग्यश्री ज्ञानेश्वर जाधव (दोघे. रा. हातणी) या पतीपत्नीला तसेच दुसऱ्या दुचाकीवरील संदीप शरद झिने (२५, रा. मालगणी) या तिघांना डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. दरम्यान गंभीर जखमी अशोक गवई ९४०, रा. हातणी) याला पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथे हलविण्यात आले असल्याची माहिती पोलिस सुत्रांनी दिली.
दुसऱ्या अपघातामध्ये शिरपूरचे दोघे ठार
बुलढाणा-चिखली मार्गावर केळवद नजीकच दुसरा अपघात २४ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास घडला. यामध्ये भरधाव वेगातील चारचाकी वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिली. यामध्ये २० वर्षीय तेजस कैलास हिवाळे याचा जागीच मृत्यू झाला तर गंभीर जखमी सार्थक सुनील हिवाळे याला वन बुलडाणा मिशनचे प्रवर्तक संदीप शेळके तसेच जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राहुल बोन्द्रे यांनी तात्काळ बुलडाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र जास्त मार लागलेला असल्याने सार्थक सुनील हिवाळेला पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजी नगर येथे हलविण्यात येणार होते. मात्र ही तयारी सुरू असतानाच त्याचाही मृत्यू झाल्याचे रुग्णालयीन सुत्रांनी सांगितले.पतीपत्नी जात होते देव दर्शनासाठी या अपघातामध्ये बुलढाणा येथे मोठ्या देवीच्या दर्शनासाठी दुचाकीवर येत असलेल्या ज्ञानेश्वर जाधव आणि त्यांची पत्नी भाग्यश्री जाधव यांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे गावामध्ये हळहळ व्यक्त होत आहे. विजयादशमीच्या दिवशीच काळाने पाच जणांवर घाला घातला. त्यामुळे हातणी व शिरपूर या दोन गावावर शोककळा पसरली होती.