Homeबुलढाणा (घाटावर)बुलढाणा घाटाखाली

मराठा आरक्षण लढ्यात जरांगे पाटलांच्या आंदोलनाला राहेरी बुद्रूक ग्रामस्थांचा पाठिंबा…

Spread the love

 सिंदखेड राजा : (आपलं बुलढाणा जिल्‍हा बातमी)- मराठा आरक्षणासाठी उपोषण करणारे मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा उपोषणाचे हत्यार उपसलेले असतांनाच त्यांच्या उपोषणाच्या समर्थनार्थ बुलडाणा जिल्ह्याततील राहेरी बुद्रूक ग्रामस्थांनीही आता आक्रमक भूमिका घेतली आहे. राज्य शासनास मराठा आरक्षणासाठी दिलेली मुदत संपल्यामुळे मराठा समाजाला जोवर आरक्षण मिळत नाही तोवर आमदार, खासदार तसेच पुढारी लोकांना गावबंदीचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे. 27 ऑक्टोबर 2023 रोजी यासंदर्भातील फलक गावाच्या प्रवेशद्वारावर झळकावत ‘एक मराठा लाख मराठा’ च्या घोषणांनी ग्रामस्थांनी परिसर दणाणून सोडला होता. सोबतच यावेळी गावाच्या प्रवेशद्वारावर झळकवण्यात आलेल्या फलकावरच राजकारण्यांनी गावात येऊन अपमान करून घेऊ नये अशी सुचनाही ग्रामस्थांनी फलकावर लिहीलेली आहे. त्यामुळे मराठा आरक्षणाच्या मुद्द्याच्या संदर्भाने ग्रामस्थांची ही भूमिका आता चर्चेत आली आहे. येथील ग्रामस्थांची भूमिका बघता याचे लोन जिल्ह्यातील अन्य गावातही पसरण्याची शक्यता आहे. सिंदखेड राजा तालुक्यातील अनेक गावांमध्येही यामुळे आता नेत्यांना गावबंदी केली जाऊ शकते. मराठा समाजाला सरसकट आरक्षण द्यावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी लढा उभारला असून या लढ्याला आता बुलडाणा जिल्ह्यातही वाढता पाठिबां मिळत आहे. राहेरी बुद्रूक गावात लोकप्रतिनिधी, नेते व त्यांच्या कार्यकर्त्याना गावबंदीचे फलक लावण्यात आले आहे. जो पर्यंत आरक्षण नाही तोपर्यंत गावात प्रवेश नाही अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे.
राहेरी बुद्रूक येथील मदन देशमुख यांनी ,‘जोपर्यंत आम्हाला आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत कोणत्याच पक्षाच्या नेत्यांनी गावामध्ये येऊ नये’, असे प्रसारमाध्यमांशी बोलतांना सांगितले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page