प्रतिबंधीत गुटखा वाहतूक प्रकरणी ३ आरोपींच्या मुसक्या आवळल्या
11 लाख 40 हजाराचा मुददेमाल जप्त
देऊळगावराजा : आपलं बुलढाणा जिल्हा बातमी- अवैधरित्या प्रतिबंधीत गुटख्याची वाहतूक प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली असून आरोपीकडून 11 लाख 40 हजाराचा मुददेमाल जप्त करण्यात आला आहे. ही घटना 26 ऑक्टोबर 2023 रोजी घडली.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, राजुर जि. जालना येथून प्रतिबंधीत गुटखा घेवुन जाणारी एम. एच. 45-एन- 0426 क्रमांकाची क्रुझर देऊळगांवराजा मार्गे सिंदखेड राजाकडे जाणार असल्याची माहीती पोलीसांना मिळाली. सदर माहितीच्या आधारे नाकाबंदी केली असता क्रुझर एम. एच. 45-एन- 0426 येत असतांना दिसली. पोलीसांनी वाहनाची तपासणी केली असता त्यात प्रतिबंधीत गुटखा आढळून आला. यावेळी वाहन चालक ज्ञानेश्वर उत्तमराव देशमुख वय 36 वर्ष रा. शिवणी टाका ता. सिंदखेड राजा, शिवलिंग पुरुषोत्तम आप्पा व्यवहारे वय 44 वर्ष रा. सोमवार पेठ गल्ली सिंदखेड राजा, सद्दाम निन्नु चौधरी वय 28 वर्ष रा. शिवणी टाका यांना ताब्यात घेतले. क्रुझर वाहनाची पंचासमक्ष पाहणी केली. वाहनाच्या मागील सिटावर ठेवलेल्या पोतडया उघडून पाहिल्या असता तंबाखुजन्य गुटखा पान मसाला, प्रीमियम राजनिवास सुगन्धित पान मसालाचे 1000 पुडे प्रत्येकी किंमत 192 रुपये व प्रीमियम जेड एल-01 जाफरानी जर्दा कंपनीच्या 1000 पुडे प्रत्येकी किंमत 48 रुपये तसेच क्रुझर क्रमांक एम.एच. 45-एन- 0426 किंमत अंदाजे 9,00,000 रुपये असा एकूण 11,40,000 रुपया चा मुददेमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी आरोपी विरूध्द भादंवि कलम 188, 273. 328 भादवी सह कलम अन्न सुरक्षा मानके कायदा 2006 कलम 26 (2) (IV) शिक्षापात्र कलम 59 (1) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सपोनि हेमंत शिंदे पोस्टे देऊळगांव राजा हे करीत आहे.