जिल्ह्यात १०७ कोटींचे वीज बिल थकले!
पुनर्जोडणी शुल्क भरल्यानंतरच वीज पुरवठा होणार सुरू
बुलढाणा- आपलं बुलढाणा जिल्हा बातमी :- वीज बिलाच्या थकबाकीत झालेली वाढ ही महावितरणसाठी गंभीर बाब आहे. परिमंडलातील घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक आणि इतर वर्गवारीतील ग्राहकांकडील १०७ कोटी रूपयांच्या वीजबिलाच्या वसुलीसाठी महावितरणने वीजबिल वसुली मोहीम हाती घेतली आहे. बुलढाणा जिल्ह्यातही वीज बिल वसुली मोहिमेला आता वेग आला आहे.
परिमंडलाअंतर्गत अकोला, बुलढाणा आणि वाशिम जिल्ह्यातील वीज बिलाची थकबाकी कमी होण्याऐवजी वाढत आहे. त्यामुळे या वसुली मोहिम तीव्र करून थकबाकी न भरणाऱ्या ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करण्यात येत आहे. याशिवाय खंडित करण्यात आलेला वीज पुरवठा तत्काळ ऑनलाईन प्रणालीत भरण्याचे बंधन करण्यात आले असल्याने, संपूर्ण थकबाकीसह सींगल फेज साठी ३६० आणि थ्री फेज साठी ६१४ रूपयाचे पुनर्जोडणी शुल्क भरल्याशिवाय त्या ग्राहकाचा वीज पुरवठा सुरू करता येत नाही. महिन्याचे शेवटचे चार दिवस बाकी असताना परिमंडलाअंतर्गत बुलढाणा जिल्हा १०७ कोटी रूपयाचे थकीत वीजबिल येणे बाकी आहे.
खंडित वीज पुरवठ्याची अधीक्षक अभियंताकडून तपासणीवीज पुरवठा खंडित केल्यानंतरही वीज बिल वसुली होत नसल्याने अधीक्षक अभियंता पवनकुमार कछोट यांच्याकडून आकस्मिकपणे अश्या ग्राहकांची तपासणी करण्याला वेग दिला आहे. जर ग्राहकांकडे अनधिकृत वीज पुरवठा सुरू असल्याचे आढळल्यास त्या ग्राहकांवर वीज चोरी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.