विठू माऊली केमिकल अँड गॅसेस कंपनीला भीषण आग
चिखली एमआयडीसी मध्ये भीषण अग्नी तांडव एक कोटी पेक्षा जास्त रुपयाची वित्तहानी सुदैवाने जीवित हानी टळाली
चिखली- आपलं बुलढाणा जिल्हा बातमी- चिखली एमआयडीसी मधील विठू माऊली केमिकल अँड गॅसेस कंपनीला दिनांक १ नोव्हेंबर रोजी भीषण आग लागली. यामध्ये सुदैवाने जीवितहानी टळाली परंतु एक कोटी पेक्षा जास्त रुपयाची वित्तहानी झाली आहे.
सविस्तर वृत्त असे की, चिखली एमआयडीसी येथे गजानन विष्णू सुरूशे, डॉ. विजय गिर्रे, दिलीप गोरे यांची सर्जिकल कॉटन तयार करणाऱ्या विठू माऊली केमिकल अँड गॅसेस कंपनीला १ नोव्हेंबर २०२३ रोजी ३:३० वाजताच्या सुमारास कंपनीचे काम सुरू असताना मशीन गरम होऊन अचानक आग लागली. आग एवढी भीषण होती की, तब्बल एक ते दीड तासांत नंतर चिखली नगरपालिका व बुलढाणा येथील अग्निशामक दलाच्या अग्नी वीरांना अग्नीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. सुदैवाने कंपनीमध्ये मजूर काम करत असताना कुठलीही जीवित हानी झाली नाही. घटनेची माहिती मिळताच महसूल विभागाचे अधिकारी कर्मचारी, चिखली पोलीस स्टेशनचे ठाणेदार संग्राम पाटील व पोलीस कर्मचारी, यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे. घडलेल्या या अचानक अपघातामध्ये कंपनीच्या झालेल्या नुकसानीची संबंधित विभागाने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी गजानन सुरूशे यांनी केली आहे. सदर कंपनीला लागलेल्या आगीमध्ये कंपनीचे रॉ मटेरियल, फिनिस गुड तयार झालेला माल, कंपनीच्या रूम, मशनरी, व इतर साहित्य जळून खाक झाल्यामुळे कंपनीचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.