सरकारकडून ५० दिवसांच्या मुदतीनंतरही धनगर आरक्षणाबाबत हालचाल नाही; तरुण आक्रमक, टॉवरवर चढून आंदोलन
मेहकर:- आपलं बुलढाणा जिल्हा बातमी- धनगर समाजाला आरक्षण मिळावे यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही सर्वजण लोकशाही मार्गाने विविध स्वरूपाचे आंदोलन करीत आहोत. मात्र, आमची मागणी अजूनही मंजूर झालेली नाही. सरकारने ५० दिवसांचा वेळ घेऊन धनगर समाजाच्या आरक्षणासंदर्भात मार्ग काढतो असे आश्वासन दिले होते. १५ नोव्हेंबर रोजी ५० दिवसांची मुदत पूर्ण होत असून आजपर्यंत धनगर आरक्षणासंदर्भात सरकारकडून कोणत्याही हालचाली झाल्याचे दिसून येत नाही असे म्हणत धनगर समाजाच्या आरक्षणासाठी गजानन बोरकर (रा. सोनाटी तालुका मेहकर) येथील टॉवरवर चढले आहेत. गजानन बोरकर यांनी आंदोलन करू नये यासाठी १४ नोव्हेंबर पासून पोलीस गजानन बोरकर यांचा शोध घेत होते. मात्र, गजानन बोरकर हे आपल्या आंदोलनावर ठाम असून कोणत्याही परिस्थितीत धनगर समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे अशी त्यांची भूमिका आहे. त्यामुळे ते पोलिसांच्या हातावर तुरी देऊन १६ नोव्हेंबर रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सोनाटी येथील टॉवरवर चढून आंदोलन करीत आहेत.गजानन बोरकर हे सर्वसामान्य कुटुंबातील युवक आहेत. आपल्या समाजाला आरक्षण मिळावे, समाजातील मुला-मुलींचे भविष्य उज्वल व्हावे यासाठी गजानन बोरकर हे गेल्या अनेक दिवसांपासून समाज जागृतीचे काम करीत आहेत. समाजामध्ये जागृती व्हावी शासनाच्या विविध योजनांचा लाभ समाजाला मिळावा विविध शासकीय कार्यालयामध्ये समाजाची कामे व्हावी यासाठी गजानन बोरकर सदैव पुढाकार घेत असतात. धनगर समाजाला आरक्षण मिळावे यासाठी गजानन बोरकर यांनी ऑक्टोंबर महिन्यात नऊ दिवस आमरण उपोषण केले होते.
या उपोषणाच्या वेळी महाराष्ट्रातील धनगर समाजातील नेते मंडळी सामाजिक कार्यकर्ते यांनी मेहकर येथे मोर्चाचे आयोजन केले होते. धनगर समाजाचा बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर येथे पहिल्यांदाच एवढा मोठा मोर्चा निघाला होता. जोपर्यंत धनगर समाजाला आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत मी लोकशाही मार्गाने सतत पाठपुरावा करून वेळ प्रसंगी तीव्र स्वरूपाचे आंदोलनसुद्धा सुरू करणार असल्याचे गजानन बोरकर यांनी यावेळी सांगितले. सरकार धनगर समाजाला आरक्षण देण्यासाठी जाणीवपूर्वक हलगर्जीपणा करीत असून यामुळे धनगर समाजातील शिक्षण घेणाऱ्या मुला-मुलींचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. तर शासनाच्या योजनासुद्धा धनगर समाजातील गोरगरिबांना लाभ मिळत नाही अशी खंत यावेळी त्यांनी व्यक्त केली.महाराष्ट्रातील धनगर समाज बांधवांनी माझ्या पाठीमागे उभे राहून मला सहकार्य करावे असे आवाहनही यावेळी गजानन बोरकर यांनी समाज बांधवांना केले आहे. १६ नोव्हेंबर रोजी गजानन बोरकर हे बुलढाणा जिल्ह्यातील सोनाटी येथील टॉवर वर जाऊन आंदोलन करीत असून यावेळी धनगर समाजातील समाज बांधवांनी मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी व्हावे असे सुद्धा त्यांनी समाज बांधवांना आवाहन केले आहे.