माता न तूं वैरिणी! एक पाय कापलेल्या अवस्थेत अर्भक आढळले; घटनेनं परिसरात खळबळ
शेगाव- आपलं बुलढाणा जिल्हा बातमी : जिल्ह्यातील शेगाव शहरातील उच्चभ्रू वस्तीमध्ये अवघ्या एक दिवसाच्या स्त्री जातीच्या बाळाला निर्दयी मातेने फेकून दिल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आजच जन्मलेल्या बाळाचा १ पाय कापलेल्या स्थितीत मिळून आल्याने शंका कुशंकांना पेव फुटले आहे. या अर्भकाला रात्री टाकून दिल्यानंतर कुत्र्यांनी पाय खाल्ला असेल, असा अंदाज व्यक्त केल्या जात आहे. अनैतिक संबधातून हे बालक जन्मला आल्याने त्यास निर्जनस्थळी फेकून दिले असावे, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला असून या प्रकरणी पोलिसांनी मार्ग नंबर ६०/२३ कलम १७४ नुसार दाखल केला असून या संदर्भात कुणाला माहिती असल्यास त्यांनी तपास अधिकारी पोहेकॉ वाकेकर मोबाईल क्रमांक ९८२३२७६७१७ किंवा शहर पोलीस स्टेशनच्या ०७२६५२५२०१० यावर संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.