संविधान दिनानिमित्त मतदार नोंदणी सप्ताहात नावनोंदणी करा- जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील
बुलडाणा :- भारत निवडणूक आयोगाने दि. १ जानेवारी २०२४ या अर्हता दिनांकावर मतदार यादीचा विशेष पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे. या पुनरीक्षण कार्यक्रमाअंतर्गत २७ ऑक्टोबर ते ०९ डिसेंबर २०२३ या कालावधीत सर्व विधानसभा मतदार संघ व मतदान केंद्रस्तरीय अधिका-यांच्या स्तरावर दावे व हरकती स्विकारण्यात येणार आहेत. तसेच संविधान दिनानिमित्त जिल्ह्यात २६ नोव्हेंबरपासून मतदार नोंदणी सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून, नवयुवक -युवतींनी नावनोंदणी करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.
संविधान दिनानिमित्त जिल्ह्यात २६ नोव्हेंबर ते ०४ डिसेंबर २०२३ या कालावधीमध्ये मतदार नोंदणी सप्ताह राबविण्यात येणार आहे. त्यांतर्गत नव्याने नाव नोंदणीस पात्र नागारिकांकडून मतदार नोंदणी, मतदार यादीतील नोंदीच्या दुरुस्ती वा वगळणीचे अर्ज मागविणे, वंचित घटकातील मतदारांची नोंदणी, मतदार नोंदणी करुन घेण्यासाठी विशेष शिबिरांचे आयोजन, विद्यार्थी, महिला व दिव्यांग व्यक्तीसाठी विशेष शिबिरांचे आयोजन, तृतीय पंथी, शरीरविक्रय करणा-या महिला, भटक्या व विमुक्त जमातीतील व्यक्तींची मतदार नोंदणी तसेच १८-१९ वयोगटातील मतदार नोंदणीची टक्केवारी वाढविण्यासाठी ERO व AERO यांनी संबंधित शैक्षणिक संस्थांमध्ये विशेष मोहिमा, युवक-युवतींची मतदार नोंदणी वाढविण्यासाठी स्वयंसेवी संस्था, महाविद्यालयातील कर्मचारीवृंद, स्वयंसेवकांची मदत घेण्यात येणार आहे.
तालुका स्तरावरून योगदानाबाबत महाविद्यालय व संस्थांचा गौरव करून त्यांना प्रशस्तीपत्रे देण्यात येणार आहे. दिव्यांग मतदारांसाठी विशेष मोहिमा राबविण्यात येणार आहेत.
२६ नोव्हेंबर ते ४ डिसेंबर २०२३ या कालावधीमध्ये मतदार नोंदणी सप्ताहामध्ये नागरिकांनी ऑफलाईन पद्धतीने मतदार नोंदणी करण्यासाठी संबंधित तहसिल कार्यालय, केंद्र स्तरीय अधिकारी यांच्यासोबत संपर्क साधावा. तसेच ऑनलाईन पद्धतीने मतदार नोंदणी करण्यासाठी Voterportal.in व Voter helpline app चा वापर करून मतदार नोंदणी, वगळणी, दुरूस्ती करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.