३० हजाराची लाच घेतांना मोताळ्याचा तलाठी एसीबीच्या जाळ्यात!
मोताळा-आपलं बुलढाणा जिल्हा बातमी- सरकारकडून स्वच्छ प्रशासनाच्या कितीही बाता हाणल्या जात असल्या तरी काही सरकारी अधिकारी खायचे सोडत नाहीत. ते अधिकारांचा गैरवापर करून सामान्यांना लुटतात. माया जमवतात.. मात्र कधीतरी त्यांच्या पापाचा घडा भरतोच. मोताळा तहसील कार्यालयात तलाठी असलेल्या किशोर कन्हाळेच्या बाबतीतही तेच घडल… त्याला ३० हजार रुपयांची लाच घेतांना अमरावती एसीबी पथकाने रंगेहाथ पकडले..१ डिसेंबरला मोताळा साझा कार्यालयात हा प्रकार घडला..
याबाबत वृत्त असे की, मोताळा तालुक्यातील रोहिणखेड येथील ६१ वर्षीय व्यक्तीने त्यांच्या शेतजमिनीच्या हिस्सेवाटणीचे प्रकरण तलाठी किशोर कऱ्हाळे याच्याकडे दाखल केले होते. त्यासाठी कन्हाळे याने ३० हजार रुपयांची लाच मागितली. त्यामुळे सदर शेतकऱ्याने अमरावतीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (एसीबी) याप्रकरणाची तक्रार केली. तक्रारीची सत्यता पडताळणी केल्यानंतर १ डिसेंबरच्या सायांकाळी सापळा रचून तलाठी कन्हाळे याला रंगेहाथ पकडण्यात आले. त्याच्याविरुद्ध बोराखेडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की, कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करुन देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ लाच लुचपत प्रतिबंधक विभागाला संपर्क साधावा.