उधारीचे पैसे मागण्यास गेलेल्या मेस चालकास मारहाण
खामगाव – आपलं बुलढाणा जिल्हा बातमी :- मेसच्या डब्यांचे बाकी असलेले पैसे मागण्यासाठी गेलेल्या मेस चालकासह त्याच्या भाच्याला तिघांनी मारहाण करून जखमी केल्याची घटना पारखेड येथे उघडकीस आली.
गजानन गोपाल फरपट वय ४८ वर्षे रा. वाडी यांनी खामगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला तक्रार दिली की, पारखेड येथील रुपेश दत्ता राठोड, दत्ता राठोड, आणि राजू दत्ता राठोड यांच्याकडे मेसच्या डब्यांचे ३ हजार रुपये बाकी होते. सदर पैसे मागण्याकरिता गजानन फरपट व त्यांचा भाचा हे १ डिसेंबर रोजी रात्री ८ वाजता पारखेड येथे गेले असता उपरोक्त तिघांनी संगनमत करून त्यांना शिवीगाळ करत कपाळावर दगड मारून जखमी केले. तसेच बेदम मारहाण केली. यामध्ये गजानन फरपट व त्यांचा भाचा जखमी झाले. या तक्रारीवरून पोलिसांनी उपरोक्त तिघांविरुद्ध कलम ३२४, ३२३, ५०४, ५०६, ३४ भादंवीनुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोहेकाँ देवराव धांडे हे करीत आहेत.