अतिवृष्टीमुळे शेतकऱ्याची गळफास घेऊन केली आत्महत्या…
देऊळगाव राजा- आपलं बुलढाणा जिल्हा बातमी :- अवकाळी आलेल्या अतिवृष्टीमुळे शेतातील कपाशी पिकाचे नुकसान झाल्याने चिंताग्रस्त झालेल्या शेतकऱ्याने शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेवून आत्महत्या केली. ही घटना १ डिसेंबर रोजी तालुक्यातील दगडवाडी फाट्यावरील शेतात घडली.
याबाबत सविस्तर असे की, आगेफळ तालुका लोणार येथील मुळचे रहिवासी मारुती सदावर्ते वय ७२ वर्षे हे कुटुंबियांसह ५० वर्षापासून दगडवाडी ता. देऊळगाव राजा येथे रहायला आले असून येथेच स्थायिक झाले आहे. त्यांच्या सासऱ्यांकडे दगडवाडी फाट्यावर कुटुंबियांची सामूहिक ५ एकर शेती असून त्यातील एक एकर शेती मारुती सदावर्ते यांना कसण्यासाठी दिली आहे. अनेक वर्षापासून ते ही शेती पेरतात. दरम्यान गेल्या ५ ते ६ दिवसांपासून अवकाळी पाऊस पडून परिसरात अतिवृष्टी झाली. यामध्ये सदावर्ते यांचे एक एकरातील कपाशी पीक जमिनदोस्त होवून नुकसान झाले. या चिंतेमुळे त्यांनी आत्महत्या केल्याचे त्यांचा मुलगा संतोष सदावर्ते यांनी सांगितले. मृतकाचे पश्चात पत्नी, २ मुले, २ मुली व बराच आप्त परिवार आहे.