बुलढाणा- आपलं बुलढाणा जिल्हा बातमी- महात्मा ज्योतिबा फुले यांनी विधवासाठी कार्य केले. याला आता शंभर वर्षे उलटून गेली आहे. त्यानंतर बुलढाण्यात प्राध्यापक डी एस लहाने यांच्या संकल्पनेतून विधवा परिषद होत आहे. या परिषदेसाठी बुलढाणा नगरी सज्ज झाली आहे. सामाजिक बदलाच्या दृष्टीने ही घटना ऐतिहासिक ठरावी अशीच आहे. प्राध्यापक लहाने यांच्या या ‘मोठ्या’ कार्याची दखल राज्यातील सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्तींनी घेतली असून यासाठी अनेकांनी शुभेच्छा देत सहभागी होणार असल्याचे कळविले आहे.
शिवसाई परिवार व मानस फाउंडेशनने या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. शिवसाई कॉन्व्हेंट परिसर ,तुलसी नगर बुलढाणा येथे सदर परिषद आज 10 डिसेंबर रोजी बारा वाजता सुरू होत आहे. माजी मंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे, जिल्हाधिकारी किरण पाटील, जिल्हा परिषद सीईओ भाग्यश्री विसपुते यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित राहणार आहे. परिषदेसाठी तुलसी नगर परिसरात भव्य मंडप उभारण्यात आला आहे. तसेच नियोजनासाठी विविध समित्यांचे गठन करण्यात आले आहे.आज नियोजनार्थ बैठक शिवसाई येथे पार पडली यावेळी शहरातील अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली.
राज्यस्तरावर प्रतिसाद
विधवा परिषदेची माहिती मिळताच राज्यात सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या मान्यवरांनी या घटनेच कौतुक केले आहे. अनेक लेखक ,पत्रकार यांची उपस्थिती देखील राहणार आहे. यामध्ये कोल्हापूर येथे विधवांसाठी कार्य करणाऱ्या जया कुराणे ,लेखिका साधनाताई कोठारी कोल्हापूर,हातकणंगले येथील जेष्ठ पत्रकार संजय खाडे, सातारा जिल्ह्यातील हेराड ग्रामपंचायत सरपंच व विधवा प्रथा नष्ट करण्यासाठी पुढाकार ठराव घेऊन कार्य करणारे सुरगोंडा पाटील आदींनी स्वतः फोन करून उपस्थिती दर्शविली आहे. एकूणच बुलढाण्यात होणारी महिला विधवा परिषद मैलाचा दगड ठरणार आहे. या परिषदेमध्ये सहभागी होण्याचे आवाहन प्राध्यापक डी एस लहाने, पत्रकार गणेश निकम, दीपक मोरे, प्राध्यापक शाहिनाताई पठाण, सुरेश साबळे, प्राचार्य ज्योती पाटील, प्रतिभा भुतेकर, डॉ. गायत्री सावजी,अनिता कापरे,निर्मला तायडे,वैशाली तायडे,जयश्री बोराडे,अश्विनी सोनूने आदींनी केले आहे.