रांगोळींनी सजवत फुले वाहून खड्ड्यांचे पूजन!
वंचित युवा आघाडीचे आंदोलन : खडतर रस्त्याकडे अभिनव पद्धतीने वेधले लक्ष
बुलढाणा :-आपलं बुलढाणा जिल्हा बातमी- येळगावच्या हद्दीत येणाऱ्या हाजी मलंग दर्गा ते शरद कला महाविद्यालय परिसरापर्यंतच्या रस्त्याची पूर्णत: ‘वाट’ लागली आहे. जेथे पाऊल टाकावे, तेथे खड्डे असल्याने पादचाऱ्यांसह वाहनधारक कमालीचे वैतागले आहेत. या खडतर रस्त्याकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी सोमवार, ११ डिसेंबर रोजी वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने खड्ड्यांना रांगोळींनी सजवण्यात आले आणि त्याच खड्ड्यांचे फुले वाहून पूजन करण्यात आले.
वंचित युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष सतीश पवार यांच्या नेतृत्वात आंदोलन करून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले. रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करण्याबाबत आदेश द्यावेत, अशी मागणी यावेळी करण्यात आली. रस्त्याच्या झालेल्या दुर्दशेबाबत प्रशासनाविरोधात आंदोलनस्थळी घोषणाबाजीही करण्यात आली.
चिखली रोडवरील हाजी मलंग दर्गा ते शरद कला महाविद्यालयापर्यंतच्या रस्त्याची पांदण रस्त्यापेक्षाही वाईट अवस्था झाली आहे. या भागात मोठी लोकवस्ती आहे. कायम रहदारीचा असलेल्या रस्त्यावर नेहमीच अपघात घडतात. काही जण पडून जायबंदी झाले आहेत. राजकीय नेत्यांची उदासीनता व स्थानिक नागरिकांचा आपल्या अधिकाराप्रती असलेला बेसावधपणा, यामुळे बुलढाणा शहर व परिसर खड्डेमय बनत चालल्याचा आरोप सतीश पवार यांनी यावेळी केला.
जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने काम पूर्ण करण्यासाठी आदेशित करावे; अन्यथा वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, त्याचप्रमाणे भविष्यात जाहीरपणे स्थानिक रहिवाशांनी मतदानावर बहिष्कार घालावा, अशा स्वरूपाची जागृती केली जाईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला. या आंदोलनात अर्जून खरात, बाला राऊत, दिलीप वाघमारे, ॲड. कैलास कदम, लहासे, सुरेश जाधव, अशोक हिवाळे, समाधान पवार, शुभम पवार, मोहन औताडे, अनिल पारवे, योगेश हिवाळे, आकाश आराख, किरण पवार यांच्यासह पदाधिकारी व नागरिक सहभागी झाले होते.कर मिळूनही दोन्ही ग्रामपंचायतींची उदासीनता सुंदरखेड व येळगाव ग्रामपंचायतींच्या अंतिम हद्दीवर हा भाग वसलेला आहे. या वस्तीमधील रहिवासी बहुतांश कर्मचारी आहेत. त्यापैकी अनेकांची नावे मतदार यादीत नाहीत. त्यामुळे दोन्ही ग्रामपंचायती त्या भागातील नागरिकांप्रती उदासीन आहेत. परिसरामधील शंभर टक्के भाग हा अकृषक असून त्याचा कररुपी लाभ दोन्ही ग्रामपंचायतींना मिळतो. स्थानिक राजकीय नेत्यांची उदासीनता व कमिशन खोरी यामुळे त्या रस्त्याचे काम बऱ्याच वर्षांपासून रखडल्याचा आरोप निवेदनाद्वारे करण्यात आला आहे.