जिल्हा मुख्यालयी महिला, मुलींची कुचंबना; ‘वंचित युवा’चा सुसू आंदोलनाचा इशारा
बुलढाणा शहरात प्रसाधनगृहांचा अभाव
बुलढाणा :-आपलं बुलढाणा जिल्हा बातमी- जिल्ह्याचे ठिकाण असलेल्या बुलढाणा शहरात महिलांसाठी सुविधायुक्त प्रसाधनगृह नसल्याने महिला व तरुणींची मोठी कुचंबना होत आहे. बुलढाणाच नव्हेतर जिल्ह्यातील शहरांमध्ये हेच चित्र आहे. या गंभीर समस्येकडे वंचित बहुजन युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष सतीश पवार यांनी पालकमंत्र्यांचे लक्ष वेधले आहे. तीस दिवसांत महिलांसाठी स्वच्छतागृहे बांधून द्यावीत; अन्यथा ‘सुसू’ आंदोलनाचा मार्ग अवलंबवावा लागेल, असा इशारा पवार यांनी दिला आहे.
महिलांची लघुशंकेबाबत होणारी गैरसोय तातडीने दूर करावी, यासाठी वंचित बहुजन युवा आघाडीने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पालकमंत्री दिलीप वळसे पाटील यांना निवेदन पाठवले आहे.
बुलढाणा हे जिल्ह्याचे मुख्यालय असल्याने येथे जिल्हाभरातून लोक येतात. यामुळे शहरामध्ये कायम रहदारी असते. मात्र, शहरात कुठेही स्वच्छतागृहांची नीट व्यवस्था केलेली नाही. त्यात विशेषत: महिलांच्या सोयीसाठी प्रसाधनगृह नाही. ग्रामीण भागातून येणाऱ्या महिला व मुलींना लघुशंकेबाबतच्या कुचंबनेला मोठ्या प्रमाणावर सामोरे जावे लागते. ही बाब महिलांची आब्रू वेशीवर टांगणारी आहे. या संवेदनशील विषयाकडे पालकमंत्र्यांनी लक्ष घालून महिलांची स्वच्छतागृहा अभावी होणारी गैरसोय दूर करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
येत्या 30 दिवसांत या मागणीचा सकारात्मक विचार करून जिल्ह्यातील प्रत्येक शहरांमध्ये स्वच्छतागृह सुरू न केल्यास नाइलाजाने या प्रकरणाची तीव्रता लक्षात आणून देण्यासाठी शासनाविरोधात ‘सुसू’ आंदोलन छेडावे लागेल, असा इशारा जिल्हाध्यक्ष सतीश पवार यांनी दिला आहे. निवेदन देताना जिल्हा संघटक बाला राऊत, जिल्हा महासचिव अर्जून खरात, अनिल पारवे, किरण पवार, विजय पवार, योगेश हिवाळे उपस्थित होते.