पिकांवरील कीड व रोगांवर एनपीएसएस ॲपद्वारे होणार उपाययोजना
जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतक-यांनी याचा वापर करावा - जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मनोजकुमार ढगे
बुलढाणा- आपलं बुलढाणा जिल्हा बातमी- केंद्र शासनाच्या कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयामार्फत नॅशनल पेस्ट सर्विलन्स सिस्टीम (एन.पी.एस.एस) या मोबाईल ॲपद्वारे पिकांवरील कीड व रोगांची ओळख करून देत त्यांना प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येणार आहे. तरी शेतक-यांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन कृषि विभागाने केले आहे.
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाकडून नुकतेच जिल्ह्यातील प्रगतीशील शेतकरी व कृषि विभागाचे अधिका-यांचे प्रशिक्षण आयोजित केले होते. केंद्र शासनाचे केंद्रीय एकात्मिक कीड व्यवस्थापन केंद्र, नागपूर येथील सहसंचालक डॉ.ए.के.बोहरीया, उपसंचालक डॉ. मनीष मोंढे, पिक संरक्षण अधिकारी उपस्थित होते. नॅशनल पेस्ट सर्विलन्स सिस्टीम हे ॲप प्ले स्टोअरमधून डाउनलोड करून घेतले असल्यास शेतकऱ्यांनी स्वतःच्या शेतात पिकांची निरीक्षणे घेऊन कीड व रोगांची प्राथमिक माहिती त्यात नमूद करावी. त्यावर शेतक-यांना तात्काळ उपायोजना सुचविल्या जातात व कीटकनाशक वापराबाबत माहिती मिळते त्यामुळे पिकावर तात्काळ फवारणी करून होणारे नुकसान टाळता येणार आहे. हे ॲप शेतकऱ्यांसाठी खूपच उपयुक्त ठरणार आहे.
सद्यस्थितीमध्ये या अँपद्वारे मिरची, कापूस, आंबा, मका व भात या पिकाबद्दलची कीड व रोग व्यवस्थापन बाबतची माहिती नोंदवू शकतो. कालांतराने यात इतरही पिकांचा समावेश करण्यात येणार असून, शेतकरी व कृषी विभागाचे अधिकारी, कर्मचारी हे पिकांवरील कीड व रोगांबाबतची निरीक्षणे नोंदवू शकतात.
या प्रशिक्षणावेळी जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमधील प्रगतीशील शेतकरी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृषी पर्यवेक्षक भास्कर शेळके यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपविभागीय कृषी अधिकारी ज्ञानेश्वर सवडतकर यांनी केले असून आभार प्रदर्शन तंत्र अधिकारी श्रीमती सुवर्णा आदक यांनी केले.
चिखली तालुक्यातील केळवद येथील गुंफाबाई गवई यांच्या तूर पिकाची पाहणी केली असता पिक सद्यस्थितीत शेंगा भरण्याच्या अवस्थेमध्ये असून पिकावर मर व शेंगा पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव नुकसान पातळीच्या आत आढळून आला. तसेच अशोक पाटील यांच्या हरभरा पिकाची पाहणी करण्यात आली यामध्ये मर रोगाची लागण नुकसान पातळीच्या वर आढळून आली तसेच हिरव्या बोंड अळीचा प्रादुर्भाव नुकसान पातळीच्या वर आढळून आला. प्रगतशील शेतकरी प्रकाश बोंद्रे यांच्या शेतात हरभरा पिकाची पाहणी करण्यात आली असून त्यावर उपाययोजना सुचविण्यात आल्या आहेत.
नॅशनल पेस्ट सर्विलन्स सिस्टीम ॲपचा जिल्ह्यातील सर्व शेतक-यांनी वापर करावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी मनोजकुमार ढगे यांनी केले आहे.