जिल्हा सहकार विकास समिती स्थापन करण्यास मान्यता
बुलढाणा- आपलं बुलढाणा जिल्हा बातमी: केंद्र शासनाच्या निर्देशानुसार देशातील सहकार चळवळ मजबूत करणे आणि सहकार चळवळ तळागाळातील लोकांपर्यत पोहोचविण्यासाठी राज्य आणि जिल्हा स्तरीय समिती गठीत करण्याबाबत सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाने आदेश शासन निर्णयानुसार निर्गमित केले आहेत. या शासन निर्णयानुसार जिल्हा सहकार विकास समिती स्थापन करण्यास मान्यता देण्यात आली असल्याचे जिल्हा सहकार विकास समिती अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.
नवीन बहुउद्देशिय प्राथमिक कृषी सहकारी संस्था किंवा दुग्ध, मत्स्यव्यवसाय प्राथमिक सहकारी संस्था स्थापन करणे तसेच ग्रामपंचायत, गावातील प्राथमिक सहकारी संस्था आणि भारत सरकारच्या विविध योजनांच्या एकत्रीकरणाद्वारे विद्यमान प्राथमिक कृषी सहकारी संस्थांना आणि दुग्ध, मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थांना बळकट करण्यासाठी राज्य व जिल्हा सहकार विकास समिती स्थापन करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
त्यानुषंगाने नोंदणीकृत महिला बचत गट, शेतकरी उत्पादक कंपन्या, शेतकरी उत्पादक संघांच्या सभासदांना ग्रामस्तरावर नवीन ग्रामसेवा सहकारी संस्था नोंदणी करण्यासाठी प्रोत्साहित करुन त्यांच्या माध्यमातून नवीन सहकारी संस्था नोंदणी करण्याबाबत ठरले आहे. म्हणून जिल्ह्यातील नोंदणीकृत महिला बचत गट, शेतकरी उत्पादक कंपन्या, शेतकरी उत्पादक संघ यांच्या सभासद यांनी ग्रामस्तरावर नवीन ग्रामसेवा सहकारी संस्था नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. पाटील यांनी केले आहे.