Homeबुलढाणा (घाटावर)
छत्रपती शिवाजी महाराज व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकांजवळील दारूची दुकाने हटवा
वंचित बहुजन युवा आघाडीची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी...

बुलढाणा- आपलं बुलढाणा जिल्हा बातमी- शहरातील संगम चौकात छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक व जयस्तंभ चौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक उभारले जात आहे. ही स्मारके सर्वांना प्रेरणा देणारी असून, नागरिक या महामानवांचरणी नतमस्तक होण्यासाठी येतील. मात्र, दोन्ही स्मारकांच्या अगदी जवळच दारूची दुकाने आहेत. स्मारकांच्या दृष्टीने ही अशोभनीय असलेली दुकाने तातडीने हटविण्यात यावी, अशी मागणी वंचित बहुजन युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष सतीश पवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात नमूद केल्यानुसार, संगम चौकात महाराष्ट्राचे आराध्यदैवत, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाचे काम अंतिम टप्प्यात आहे. येत्या काही दिवसांतच स्मारकाचे उद्घाटन होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे स्वराज्याचे निर्माते असून संपूर्ण बहुजनांसाठी आदर्श आहेत. तसेच आजच्या तरुण पिढीला कायम प्रेरणादायी आहेत. असे असताना या परिसरामध्ये दारूची दुकाने थाटलेली आहेत. हे तेजोमय स्मारक पाहण्यासाठी व अभिवादन करण्याकरिता जिल्हाभरातून शिवप्रेमी या ठिकाणी येणार आहेत. एकीकडे जनतेसाठी कायम आदर्श असणाऱ्या राजांचे स्मारक आणि बाजूलाच दारूचे दुकान ही बाब गंभीर आहे. तसेच जयस्तंभ चौकामध्ये महामानव, बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा भव्य पुतळा होणार असून तेथेदेखील जिल्हाभरातील नागरिक अभिवादन करण्यासाठी येणार आहेत. तेथेही काही पावलांच्या अंतरावर लागूनच दारूची दुकाने थाटलेली आहेत. महापुरुषांच्या विचारधारेनुसार दारू हा वर्ज्य घटक असून, त्यामुळे समाजाचे नुकसानच झालेले आहे. एकीकडे महापुरुषांना अभिवादन करण्यासाठी जमा होणारी गर्दी व दुसरीकडे आजूबाजूला असलेल्या दारूच्या दुकानांमध्ये होणारी तळीरामांची गर्दी ही बाब परस्परविरोधी आहे. भविष्यामध्ये यातून तणाव निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याची भीतीही सतीश पवार यांनी व्यक्त केली आहे.
ज्या महापुरुषांच्या योगदानामुळे आपण माणूस म्हणून जगत आहोत, त्याच महापुरुषांच्या स्मारकांसमोर दारू विकणे ही मानवतेसाठी लाजिरवाणी बाब आहे. दोन्ही ठिकाणच्या स्मारकांच्या बाजूला शिक्षक, पदवीधर आमदारांची ही दुकाने आहेत. ते संविधानिक पदावर कार्यरत आहेत. त्यांनी दारूची दुकाने बंद करून समाजासमोर आदर्श उभा करणे अपेक्षित होते, असेही सतीश पवार यांनी निवेदनात म्हटले आहे. निवेदन देताना बाला राऊत, अर्जून खरात, अनिल पारवे, ॲड. के.ए. कदम, किरण पवार, सचिन गवई उपस्थित होते.