गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा योजनेचा लाभ घ्या जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील
बुलढाणा :आपलं बुलढाणा जिल्हा बातमी- शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाने गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना लागू केली असून, त्यात शेती करताना होणारे अपघात, वीज पडणे, पूर, सर्पदंश, विचूदंश, विजेचा शॉक बसणे आदी नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे अपघात, तसेच इतरही विविध अपघातांमध्ये शेतक-याचा मृत्यू झाल्यास अथवा दिव्यांगत्व येते. त्यामुळे त्या कुटुंबाचे उत्पन्नाचे साधन बंद होते. अशा कुटूंबांना आर्थिक मदतीचा लाभ मिळवण्यासाठी त्यांच्या वारसांनी गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.
अपघातग्रस्त शेतकरी कुटुंबास हा लाभ देण्यासाठी वहितीधारक खातेदार शेतकरी व वहितीधारक खातेदार म्हणून नोंद नसलेले शेतक-याच्या कुटुंबातील कोणताही 1 सदस्य (आई-वडील, शेतक-याची पती पत्नी, मुलगा व अविवाहीत मुलगी यापैकी कोणतीही एक व्यक्ती) असे 10 ते 75 वर्षे वयोगटातील एकूण दोघांसाठी ही योजना राबविण्यात येत आहे. ही योजना 19 एप्रिल 2023 ते आवश्यकतेनुसार प्रथम 3 वर्षे राबविण्यात येत आहे. या योजनेमध्ये अपघाती मृत्यू अथवा अपघातामुळे दोन डोळे अथवा दोन हात किंवा दोन पाय निकामी होणे, अपघातामुळे एक निकामी होणे डोळा व एक हात किंवा एक पाय निकामी झाल्यास दोन लाख रुपयांचे सानुग्रह अनुदान मिळते तर अपघातामुळे एक डोळा अथवा एक हात किंवा एक पाय निकामी झाल्यास त्यास एक लाख रुपयांचा लाभ मिळतो.
रस्ता रेल्वे अपघात, पाण्यात बुडून मृत्यू, जंतूनाशके हाताळतांना अथवा अन्य कारणामुळे विषबाधा, विजेचा धक्का बसल्यामुळे झालेला अपपात, वीज पडून मृत्यू, खून,उंचावरून पडून झालेला अपघात, सर्प,विंचूदंश, नक्षलवाद्यांकडून झालेल्या हत्या,जनावरांचे हल्ले, चावण्यामुळे जखमी किंवा मृत्यू,बाळंतपणातील मृत्यू, दंगल आदी अपघातांचा समावेश आहे.
गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेअंतर्गत वारसदाराची निवड करताना अपघातग्रस्ताची पत्नी, स्त्रीचा पती, त्याची अविवाहित मुलगी, आई, मुलगा, वडील, सून किंवा अन्य कायदेशीर वारसदाराचा समावेश होतो.
अनुदान योजनेअंतर्गत लाभ प्राप्तीसाठी अर्जासोबत 7/12 उतारा, मृत्यूचा दाखला, शेतकऱ्यांचे वारस म्हणून गावकामगार तलाठ्याकडील गाव नमुना नं. 6 क नुसार मंजूर झालेली वारसाची नोंद, वारसदाराचे ओळखपत्र, आधारकार्ड, पॅनकार्ड, बैंक पासबुक, निवडणूक ओळखपत्र, अपघातग्रस्ताचा वयाचा दाखला यामध्ये जन्म दाखला, शाळा सोडल्याचा दाखला, शाळेच्या मुख्याध्यापकाचे प्रमाणपत्र, ग्रामपंचायतीचे प्रमाणपत्र, वाहन चालविण्याचा परवाना, पारपत्रापैकी कोणतेही एक कागदपत्र तसेच प्रथम माहिती अहवाल, घटनास्थळ पंचनामा, पोलिस पाटील माहिती अहवाल आणि अपघाताच्या स्वरूपानुसार अंतिम विमा प्रस्तावासोबत ही कागदपत्रे अर्जासोबत 30 दिवसांच्या आत सादर करावीत. अधिक माहितीसाठी कृषि विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी यांनी केले आहे.