शेतकऱ्यांच्या आंदोलनाला वन बुलढाणा मिशनचा पाठिंबा संदीप शेळकेंचा ट्रॅक्टर मोर्चात सहभाग……
बुलढाणा (आपलं बुलढाणा जिल्हा बातमी) – जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील बोरी आडगाव येथील शेतकऱ्यांनी विविध मागण्यांसाठी १ जानेवारी रोजी उपविभागीय अधिकारी कार्यालयावर काढलेल्या ट्रॅक्टर मोर्चाला वन बुलढाणा मिशनचे संकल्पक संदीप शेळके यांनी पाठिंबा देत सहभाग घेतला.
गेल्या पाच दिवसांपासून बोरी आडगाव येथील सात शेतकऱ्यांनी विविध मागण्यांसाठी उपोषण सुरु केले आहे. मात्र या उपोषणाची प्रशासशाने दखल घेतली नाही. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी आज सहाव्या दिवशी खामगाव उपविभागीय अधिकारी कार्यालयावर ट्रॅक्टर मोर्चा काढला. सर्व पिक विम्याची रक्कम खात्यात जमा करा, खामगाव तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा, सरसकट कर्जमाफी करा आदी मागण्यांसाठी शेतकरी शाम कीर्तने, वासुदेव बोहरूपी, किशोर तायडे, विठ्ठल ठाकरे, गजानन नाईक, विठ्ठल घोगे, मुरलीधर ठाकरे यांनी उपोषण सुरु केले असून सोमवारी ट्रॅक्टर मोर्चा काढला.
शेतकऱ्यांचा आवाज दाबता येणार नाही
लोकशाही मार्गाने निघालेला ट्रॅक्टर मोर्चा पोलिसांनी अडवला. ही कुठली पद्धत आहे..? बळाचा वापर करुन शेतकऱ्यांचा आवाज दाबता येणार नाही. शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे. शेतकरी जगला पाहिजे याकरिता शासनाने त्यांना पाठबळ द्यावे. शेतकऱ्यांच्या मागण्या रास्त असून त्या मान्य झाल्याच पाहिजे, अशी भूमिका संदीप शेळके यांनी मांडली.
शेतकऱ्यांवर आंदोलन करण्याची वेळ येणे दुर्दैव
आपल्या देशाची अर्थव्यवस्था शेतीवर अवलंबून आहे. कृषिप्रधान देश म्हणून आपली जगात ओळख आहे. असे असतांना आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी शेतकऱ्यांना उपोषण करावे लागते. मोर्चा काढावा लागतो. खरं म्हणजे हे दुर्दैव आहे. वन बुलढाणा मिशन खंबीरपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचे संदीप शेळके म्हणाले.