नाट्य अभिवाचन स्पर्धेत बुलढाण्याचा संघ विभागात प्रथम
बुलढाणा – आपलं बुलढाणा जिल्हा बातमी- नाट्यजागर महोत्सवात अकोला येथे २९ जानेवारी रोजी पार पडलेल्या नाट्य अभिवाचन स्पर्धेत बुलढाणा येथील अक्षरदेह नाट्य कला केंद्राच्या संघाने अकोला विभागात प्रथम क्रमांक मिळवला आहे. अ. भा. मराठी नाट्य परिषदेच्या शंभराव्या नाट्यसंमेलनानिमित्त आयोजित नाट्यजागर महोत्सवात या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
अकोला येथील श्रीमती एल. आर. टी. वाणिज्य महाविद्यालयाच्या सभागृहात २९ जानेवारी रोजी नाट्य अभिवाचन स्पर्धा घेण्यात आली. अकोला, बुलढाणा व वाशिम जिल्ह्यातील संघांची अकोला केंद्रावर नोंदणी करण्यात आली होती. यामध्ये बुलढाणा येथील अक्षरदेह नाट्यकला केंद्राच्या संघाने शशिकांत इंगळे लिखित “मी काहीही विसरलेलो नाही” या दोन अंकी नाटकातील प्रवेशाचे अभिवाचन केले. यामध्ये नाट्यकलावंत सौ. सुवर्णा कुलकर्णी पावडे, गणेश राणे, संतोष पाटील व शशिकांत इंगळे यांचा सहभाग होता. स्पर्धेचे परीक्षण सुप्रसिद्ध रंगकर्मी अरुण घाटोळे व माजी महापौर तथा रंगकर्मी सौ. अश्विनी हातवळणे यांनी केले. स्पर्धा प्रमुख तथा अ. भा. मराठी नाट्य परिषद अकोला-मलकापूर शाखेचे कार्यवाह अशोक ढेरे यांनी निकालाचे वाचन केले. अक्षरदेह नाट्यकला केंद्र बुलढाणाच्या संघाला परीक्षकांच्याहस्ते तीन हजार रुपयांचा धनादेश व उपांत्यफेरीसाठी निवड झाल्याचे प्रमाणपत्र देऊन प्रथम पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. स्पर्धेला जेष्ठ रंगकर्मी मधू जाधव, सचिन गिरी, विष्णू निंबाळकर, डॉ. सुमेधा हर्षे, डॉ. शिरीन देशमुख, श्रीकांत सोवळे यांच्यासह बहुसंख्य रंगकर्मी व रसिक उपस्थित होते.