चिखलीत दरोडेखोरांचा हैदोस; पती, पत्नीस केली मारहाण!
दोघे गंभीर : आरडाओरड केल्याने दरोडेखोर पळाले!
चिखली :-आपलं बुलढाणा जिल्हा बातमी- शहरातील गजानन नगरपरिसरातील एका घरात २ फेब्रुवारीच्या रात्री दीड वाजेच्या सुमारास दरोडेखोरांनी हैदोस घातला. दरोड्याच्या तयारीत असलेल्या दरोडेखोरांनी घराच्या मागील बाजूने असलेला दरवाजा तोडून घरात प्रवेश केला होता. दरोडेखोरांच्या मारहाणीदरम्यान आरडाओरड केल्याने दरोडेखोर पळाले असून दरोडेखोरांच्या मारहाणीत पती- पत्नी गंभीर जखमी झाले आहेत.
स्थानिक गजानन नगर येथे वास्तव्यास असलेले गजानन नवले यांच्या घरावर रात्री दीड-पावनेदोनच्या सुमारास दरोडेखोरांनी घराचा मागचा दरवाजा लोखंडी टॉमीच्या सहाय्याने फोडून घरात प्रवेश केला. घरात झोपलेल्या गजानन नवले आणि त्यांच्या पत्नी अलका नवले यांना दरडावत सोने कुठे, पैसे कुठे याची विचारणा करून लोखंडी रॉडने अलका नवले यांच्या हातावर, डोक्यावर मारत गंभीर जखमी केले, प्रतिकार करण्यासाठी गेलेल्या गजानन नवले यांना देखील बेदम मारहाण केल्याने ते भोवळ येऊन पडले. दरम्यान, गंभीर जखमी अवस्थेतही अलका नवले यांनी जोरात आरडाओरड केल्याने समोरच्या खोलीत झोपलेले
गजानन नवले यांचे भाऊ पप्पू नवले यांना जाग आली आणि ते मदतीसाठी धावले. या दरम्यान दरोडेखोर पसार झाले. याप्रकरणी केशव सीताराम नवले यांच्या फिर्यादीवरून २५ ते ३० वयोगटातील सडपातळ व उंच शरीरयष्ठी असलेल्या अज्ञात दोन व्यक्तींनी जबरी चोरी करण्याच्या उद्देशाने घरात प्रवेश करून गजानन नवले व अलका नवले यांना मारहाण करून गंभीर जखमी केल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पीएसआय नितीनसिंग चौहान करीत आहेत. दरम्यान, भरवस्तीत घडलेल्या या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे. दरम्यान या दरेड्यात नेमका किती माल गेला ही बाब अद्याप स्पष्ट झालेली नाही. दोन्ही जखमींवर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे. दुसरीकडे या घटनेमुळे चिखली शहर परिसरात नागरिकांमध्ये धास्ती बसल्याचे चित्र आहे.