माझी शाळा, सुंदर शाळा उपक्रमात स्वच्छता मॉनिटर अभियान
बुलढाणा- आपलं बुलढाणा जिल्हा बातमी- : रोहित आर्या यांच्या प्रोजेक्ट लेट्स चेंज स्वच्छता मॉनिटर अभियानाला वाढता प्रतिसाद आणि परिणाम दिसून येत आहे. त्यामुळे या अभियानाच्या दुसऱ्या टप्प्याला ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ या स्पर्धात्मक उपक्रमात सर्वाधिक १० गुणांचे महत्त्व दिले आहे.अमरावती विभागाचे शिक्षण उपसंचालक शिवलिंग पटवे यांनी प्रोजेक्ट लेट्स चेंज स्वच्छता मॉनिटर अभियान व्यवस्थित समजून परिणामकारक राबवण्यासाठी कार्यशाळा, नियोजन केले आहे. या अभियानासाठी विभाग समन्वयक मंगेश भोरसे, तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांच्या मार्गदर्शनात शिक्षणाधिकारी बी. आर खरात, सिद्धेश्वर काळूसे, उपशिक्षणाधिकारी अनिल देवकर कार्यरत आहेत. शैक्षणिक वर्षाअखेर या अभियानात जिल्ह्यातील सुमारे 1 हजार 200हून अधिक शाळांनी swachhtamonitor.in संकेतस्थळावर सहभाग नोंदवला आहे. मागील प्रोजेक्ट लेट्स चेंज स्वच्छता मॉनिटर अभियानात जिल्ह्यातील 23 शाळांनी राज्यातील सर्वोत्तम शाळेचा मान पटकावला आहे. दुसऱ्या टप्यातही जिल्ह्यातील शाळा सहभागी आहेत. राज्यातून कचऱ्याबाबत होणाऱ्या निष्काळजीपणाची सवय कायमस्वरूपी मोडून काढण्याचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सर्व शाळांनी अभियानाचे स्वरूप समजून सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.