गाडीतून बॅग चोरतांना एकास पकडले, दोन पसार
खामगाव- आपलं बुलढाणा जिल्हा बातमी :- चारचाकी गाडीचे चालकाच्या बाजूचे टायर पंक्चर आहे, असे मालकाला सांगत, त्याच वेळी गाडीतील दोन लाख रुपये रकमेची बॅग पळविण्याचा प्रयत्न करणाऱ्या मुलाला रंगेहात पकडल्याची घटना सोमवारी दुपारी १:३० वाजता शहरातील रेल्वे स्थानकालगतच्या चहा टपरीसमोर घडली. यावेळी त्याचे दोन साथीदार पळून गेले. शहर पोलिसात तक्रार नोंदविण्यात आली.
रेल्वे स्थानकालगतच्या चहा टपरीजवळ शहरातील गुलजम्मा शाह (रा. टीचर कॉलनी) यांनी चारचाकी वाहन थांबवून मित्रासोबत बोलत होते. यावेळी एका अल्पवयीन मुलाने त्यांना त्यांच्या गाडीचे चालकाच्या बाजूचे टायर पंक्चर झाल्याचे सांगितले. त्यामुळे टायर पाहण्यासाठी शाह गेले असता, अल्पवयीन मुलाने वाहनातील २ लाख रुपये असलेली बॅग घेत पळ काढला. ही घटना चहा दुकानातील कामगार वैभव हरमकार व मंगेश हरमकार यांच्या निदर्शनास आली. त्यांनी आरडाओरड केली. त्यामुळे नागरिकांचे लक्ष अल्पवयीन मुलाकडे गेले. त्या मुलाला तत्काळ पकडण्यात आले. त्याच्यासोबत असलेली दोन मुले पळून जाण्यात यशस्वी झाली.