ग्रामपंचायत कार्यालय मेरा बुद्रुक व गोदावरी फाउंडेशन जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य आरोग्य शिबिर संपन्न.
परिसरातील शेकडो रुग्णांनी घेतला लाभ
चिखली :-आपलं बुलढाणा जिल्हा बातमी- चिखली तालुक्यातील मेरा बुद्रुक येथे दिनांक 12 फेब्रुवारी 2024 रोजी ग्रामपंचायत कार्यालय मेरा बुद्रुक व गोदावरी फाउंडेशन जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ ग्रामपंचायत मेरा बुद्रुकला तीन वर्षे कार्यकाळ पूर्ण झाला यानिमित्ताचे अवचित्य साधून भव्य आरोग्य शिबीर मोठ्या उत्साहात संपन्न झाले. या भव्य आरोग्य शिबिराच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष मेरा बुद्रुक गावचे सामाजिक कार्यकर्ते परशुअण्णा पडघान हे होते तर, उद्घाटक डॉ.रिंगे हे होते. प्रमुख पाहुणे व मार्गदर्शक चिखली तालुका आरोग्य अधिकारी डॉ.रिंगे होते. या भव्य आरोग्य शिबिराचे आयोजक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे बुलढाणा उपाध्यक्ष गजानन वायाळ हे होते. या अगोदरही गजानन वायाळ यांच्या संकल्पनेतून व पुढाकाराने सर्व ग्रामपंचायत सदस्य व कर्मचारी वृंद यांच्या अनमोल सहकार्याने वेगवेगळ्या प्रकारचे ग्रामपंचायतच्या वतीने आरोग्य शिबिर घेण्यात आले होते. परंतु या भव्य आरोग्य शिबिरामध्ये मोफत ईसीजी कार्डिओग्राफ, रक्तदाब तपासणी, मुतखडास, मूत्रपिंडातील खडे, प्रोस्टेट ,पित्ताशय खडा, स्वादुपिंड, छोट्या गाठी ,मुळव्याध, हायड्रोसिल, अंडाशय शस्त्रक्रिया, भगंदर पित्ताशयाचे खडे पायातील शिरा फुटणे मूत्रपिंडाचे आजार पोट व आतड्यांच्या शस्त्रक्रिया कर्करोग निदान, बालरोग शस्त्रक्रिया, मेंदू मनका फक्चर, नाक ,कान, घसा शस्त्रक्रिया, नेत्रालय ,हृदयरोग, जनरल मेडिसिन, गर्भपिशवी ,अस्थिरोग, मानसोपचार इत्यादी रोगावर तपासणी व मार्गदर्शन मोफत करण्यात आले. सर्वसाधारणपणे कोणत्याही आजाराचे लवकर निदान झाले तर त्यावर उपचारही लवकर होतात व त्या रोगापासून मुक्तता मिळते नव्हे तर रोग संपूर्णपणे बरा होतो त्यासाठी प्राथमिक तपासण्या करणे गरजेचे असते.
रोगाचे लवकर निदान नाही झाले तर इलाजही लवकर होत नाही कालांतराने रोगप्रतिकार शक्ती कमी होऊन तो आजार बळकावतो व वेळप्रसंगी मृत्यूही होऊ शकतो. त्यासाठी आरोग्याच्या शरीराच्या वेगवेगळ्या प्राथमिक तपासण्या करणे गरजेचे असते. त्याचाच एक भाग म्हणून ग्रामीण भागातील गरजू रुग्णांसाठी राष्ट्रवादीचे नेते तथा बुलढाणा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उपाध्यक्ष गजानन वायाळ यांनी या भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिरामध्ये उपसरपंच दिनकर डोंगरदिवे, शिवसेना नेते राजू पाटील, परशुअण्णा पडघान, सत्तार पटेल, ग्रामपंचायत सदस्य सागर पाटील, ग्रामपंचायत सचिव प्रदीप साळवे, प्रभाकर गायकवाड यांचे सुद्धा मार्गदर्शन लाभले. या भव्य अशा आरोग्य तपासणी शिबिरासाठी अंत्रि खेडेकर व मेरा बुद्रुक येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथील सर्व वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी सुद्धा सहभाग घेतला होता. भव्य अशा या आरोग्य शिबिराचा शेकडो गरजू रुग्णांनी लाभ घेतला. यावेळी मोफत औषधी वितरण सुद्धा करण्यात आले. ज्या रुग्णांना शस्त्रक्रिया करण्याची गरज आहे किंवा अधिकच्या तपासण्या करण्याची गरज आहे त्यांच्यासाठी गोदावरी फाउंडेशन जळगाव यांच्या मार्फत मोफत शस्त्रक्रिया व तपासणी होणार आहे. आरोग्य शिबिर यशस्वी करण्यासाठी सर्व ग्रामपंचायत सदस्य कर्मचारी वृद्ध व ग्रामस्थ मंडळी तथा ग्रामपंचायत कर्मचारी सखाराम खर्डे, मुबारक शहा, संदीप चेके,रवि जाधव ,संदेश चव्हाण ,बाबू तोडे ,अश्विन अंभोरे, राहुल हिवाळे यांनी परिश्रम घेतले.