पंजाब नॅशनल बँकेच्या व्यवस्थापकास चाकू मारून केले जखमी
खामगाव-आपलं बुलढाणा जिल्हा बातमी- शेतकरी बचत गटाचे पैसे काढण्यासाठी आलेल्या संस्थेच्या सचिवासोबत झालेल्या शाब्दीक वादातून पंजाब नॅशनल बँकेच्या व्यवस्थापकास धारधार चाकून वार करून गंभीर जखमी केल्याची घटना येथील टॉवर चौकाजवळी पंजाब नॅशनल बँकेच्या शाखेत १३ फेबुवारी रोजी दुपारी उघडकीस आली. या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली असून जखमी बँकेच्या व्यवस्थापकाला उपचारार्थ खाजगी रूग्णालयात भरती करण्यात आले असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
तालुक्यातील जळका भडंग येथील संत गजानन शेतकरी स्वयंसहायता बचत गटचे सचिव किरण गायगोळ हे १३ फेब्रुवारी रोजी दुपारी शहरातील टॉवर चौकस्थित पंजाब नॅशनल बँकेच्या शाखेमध्ये संस्थेच्या बचत गट खात्यातून शेतकऱ्यांना द्यावयाचे पैसे काढण्यासाठी आले होते. दरम्यान बँकेचे व्यवस्थापक शंतनू राऊत यांनी किरण गायगोळ यांना पैसे काढण्यासाठी संस्थेच्या प्रोसेडिंग बुकची प्रत आण्यासाठी सांगितले. मात्र आरोपी किरण गायगोळ यांनी मागच्या वेळेस आपण प्रोसेडिंग बुकच्या झेरॉक्स कॉपीवरच पैसे दिले होते असे म्हणाले. मात्र व्यवस्थापकांनी खरी प्रोसेडिंग बुक नक्कल शिवाय पैसे मिळणार नाही असे सांगितल्याने त्यांच्यामध्ये शाब्दीक वाद झाला. अचानक आरोपी किरण गायगोळ याने त्याच्या सोबत आणलेला चाकू खिशातून काढून बँक व्यवस्थापक शंतनू राऊत यांच्या पोटावर वार केले. यावेळी सहाय्यक व्यवस्थापक निबांळकर यांनी त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्या हातावरही चाकू लागल्याने ते जखमी झाले. बँकेतील कर्मचाऱ्यांनी व्यवस्थापकास उपचारार्थ शहरातील खासगी रूग्णालयात दाखल केले. घटनेची माहिती मिळताच शहर पोलिसांनी घटनास्थळी घाव घेतली व आरोपी किरण गायगोळ यांना ताब्यात घेवून त्याने वापरलेला चाकूही जप्त केला. वृत्त लिहेपर्यंत पोलिसांची कारवाई सुरु होती.