रात्री 12 वाजेपर्यंत ध्वनीवर्धन वापरास सूट
बुलढाणा:- आपलं बुलढाणा जिल्हा बातमी- शासनाच्या निर्णयानुसार ध्वनीवर्धन वापरात 15 दिवसांची सूट जाहिर करण्यात आली आहे. त्यानुसार जिल्हाधिकारी यांना दिलेल्या अधिकारानुसार 12 दिवसांसाठी ध्वनीवर्धन वापरास सूट देण्यात आली आहे. यामुळे सूट असलेल्या दिवशी रात्री 12 वाजेपर्यंत ध्वनीवर्धन वापरात येणार आहे.
ध्वनीवर्धन वापराबाबत श्रोतृगृहे, सभागृहे, सामुहिक सभागृहे आणि मेजवानी कक्ष यासारख्गा बंद जागा खेरीज इतर ठिकाणी जिल्ह्याच्या निकडीनुसार वर्षामध्ये 15 दिवस निश्चित करुन सकाळी 6 ते रात्री 12 वाजेपर्यंत सूट जाहीर करण्यासाठी जिल्हाधिकारी यांना प्राधिकृत केले आहे. जिल्हाधिकारी यांनी संबंधित ध्वनी प्राधिकरण तथा पोलीस अधिक्षक पोलीस आयुक्त यांच्याशी सल्लामसलत करुन जिल्हयासाठी 1 जानेवारी ते 31 डिसेंबर या कालावधीमध्ये 15 दिवस निश्चित करून त्याची आगाऊ यादी तयार करण्याबाबत सूचना आहेत. त्यानुसार जिल्हादंडाधिकारी यांनी ध्वनीपेक्षक व ध्वनीवर्धक यांचा वापर ध्वनीची विहित मर्यादा राखून सकाळी 6 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत 12 दिवस अटी आणि शर्तीच्या अधिन राहून जाहीर करीत आहे. यात शिवजयंती, ईद-ए-मिलाद, डॉ आंबेडकर जयंती, 1 मे महाराष्ट्र दिन, गणपती उत्सवातील 4 दिवसात दुसरा दिवस, पाचवा दिवस, गौरी विसर्जन व अनंत चर्तुदशी, नवरात्री उत्सवामधील 2 दिवसात अष्टमी व नवमी, दिवाळीतील 1 दिवस लक्ष्मीपूजन, 31 डिसेंबर रोजी एक दिवस असे एकूण 12 दिवस वरीलप्रमाणे 12 दिवस जाहिर करण्यात आले आहे. उर्वरीत 3 दिवस राखीव ठेवण्यात आले असून महत्त्वाचे वेळी व गरज भासल्यास त्या वेळी निश्चित करण्यात येणार आहे, असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.