महासंस्कृती महोत्सवाचे थाटात उद्घाटन
गायक राहुल सक्सेना यांच्या संगीत रजनी कार्यक्रमाने सुरुवात
बुलढाणा- आपलं बुलढाणा जिल्हा बातमी :- पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग आणि जिल्हाधिकारी कार्यालय बुलढाणा यांच्या वतीने आयोजित महासंस्कृती महोत्सवाचे आज दि. १२ फेब्रुवारी रोजी थाटात उद्घाटन झाले. जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांच्या हस्ते दिप प्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी सुनिल विंचरकर, निवासी उपजिल्हाधिकारी सदाशिव शेलार, उपविभागीय अधिकारी रामेश्वर पुरी, तहसीलदार अतुल पाटोळे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक अशोक थोरात, मुख्याधिकारी प्रशांत शेळके आदी उपस्थित होते.
महासंस्कृती महोत्सवास आज पासून सुरुवात झाली आहे. खामगाव येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानावर दोन दिवसीय सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे. आज पहिल्या दिवशी दि. १२ फेब्रुवारी रोजी गायक राहुल सक्सेना यांच्या समूहाचा संगीत रजनी कार्यक्रम झाला. गणेश वंदनाने संगीत रजनीची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर राहुल सक्सेना यांनी विविध गीते सादर केली. शामल देशमुख यांनी सूत्रसंचालन केले.
महासंस्कृती महोत्सवात मंगळवार दि. 13 फेब्रुवारी रोजी राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित निश्चयपूर्तीचे महामेरू हे महानाट्य आयोजित करण्यात आले आहे. महासंस्कृती महोत्सवाच्या पहिल्या दिवशी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानावर पन्नासहून अधिक विविध स्टॉल्स लावण्यात आलेले आहे. यात प्रामुख्याने जिल्ह्यातील महत्त्वाच्या विभागांचे स्टॉल लावण्यात आलेले आहे. तसेच खाद्य संस्कृती जपणाऱ्या बचतगटांचे स्टॉल्स या ठिकाणी लावण्यात आलेले आहे. स्टॉल्समध्ये प्रामुख्याने स्थानिक खाद्यपदार्थ, हस्तकला, वन विभागाचे माहिती, जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण पर्यटन स्थळाची माहिती, स्थानिक पारंपरिक वस्त्रांचे दालन आदींचे स्टॉल या ठिकाणी लागलेले आहेत.