खडकपूर्णातील अवैध वाळू उपशावर कारवाई सुरू. एनडीआरएफने उध्वस्त केल्या ६ बोटी सीआरपीएफने पुरवले संरक्षण; अद्यापही शोध मोहीम सुरूच
चिखली- आपलं बुलढाणा जिल्हा बातमी : खडकपूर्णा जलाशयातील वादग्रस्त ठरलेल्या अवैध वाळू उपसा विरोधात सर्वत्र ओरड होत असताना आणि इसरुळ ग्रामपंचायतचे माजी सरपंच संतोष भुतेकर यांनी आत्मदहनाचा इशारा दिल्यानंतर प्रशासनाला खडबडून जाग आली असून आता खडकपूर्णा जलाशयातील अवैध वाळू उपसा करणाऱ्या बोटींवर धडाकेबाज कारवाई करण्याची मोहीम महसूल विभागाने हाती घेतली आहे. या अंतर्गत दि. १३ व १४ फेब्रुवारी रोजी एन डी आर एफच्या टीमने सीआरपीएफ जवानांच्या संरक्षणात केलेल्या कारवाईमध्ये ६ बोटी उध्वस्त करण्यात आल्या असून आणखी काही बोटी आढळतात का त्याचा शोध घेण्याची मोहीम सुरू आहे.
याबाबतची थोडक्यात माहिती अशी की, इसरुळचे सरपंच संतोष भुतेकर यांनी आपण दि. १३ फेब्रुवारी रोजी मंत्रालयात महसूलमंत्र्यांच्या दालनात आत्मदहन करणार असल्याचा इशारा जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राज्य शासनाला दिला होता. या इशाऱ्यानंतर जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर आले व सिंदखेड राजा उपविभागीय महसूल अधिकारी यांच्यामार्फत भुतेकर यांना आत्मदहनापासून परावृत्त करण्याचे काम पहिले हाती घेण्यात आले. ११ फेब्रुवारी रोजी भुतेकर हे मुंबईकडे निघाले असताना समृद्धी महामार्गावर त्यांना अंढेरा पोलिसांनी ताब्यात घेतले व सिंदखेड राजाचे उपविभागीय अधिकारी समाधान गायकवाड यांच्यासमोर उपस्थित केले. तेथे झालेल्या चर्चेतून समाधान झाल्यामुळे भुतेकर यांनी आपले आत्मदहन रद्द केले. उपविभागीय अधिकारी गायकवाड यांनी दिलेल्या लेखी आश्वासनानुसार लगेच खडकपूर्णा जलाशयातील अवैध वाळू उपसा करणाऱ्या बोटींची शोध मोहीम एनडीआरएफच्या टीमने हाती घेतली. या टीमला संरक्षण पुरण्यासाठी सीआरपीएफचे जवान देखील तैनात करण्यात आले. या शोध मोहिमेंतर्गत ६ बोटी आढळून आल्या. ह्या सर्व बोटी जेसीबीच्या सहाय्याने उध्वस्त करण्यात आल्या असून आणखी काही बोटी खडकपूर्णा जलाशयात मिळून येतात काय त्याचा शोध घेणे सुरू आहे. सदर कारवाई धडाकेबाज पद्धतीने सुरू असून त्यामुळे अवैध वाळू माफियांचे मात्र धाबे दणाणले आहे. ही कारवाई अशीच पुढेही कायमस्वरूपी सुरू राहावी आणि खडकपूर्णांमधील वाळू तस्करी त्वरित थांबावी अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.