Homeबुलढाणा (घाटावर)

विश्वकर्मा सन्मान योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी सुतार समाज बांधवांना सर्वतोपरी सहकार्य करू!- आमदार श्वेताताई महाले पाटील यांची सुतार बांधवांना ग्वाही

चिखली येथे प्रभू विश्वकर्मा प्रगटदिन व उद्योगदिन उत्साहात साजरा

Spread the love

चिखली – आपलं बुलढाणा जिल्हा बातमी:-  पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारची अतिशय महत्वकांक्षी व बलुतेदार समाजात आर्थिक परिवर्तन घडवणारी योजना म्हणजे विश्वकर्मा सन्मान योजना असून, सुतार समाज बांधवांनी या योजनेचा लाभ घ्यावा. काहीही अडचण आली तर आपण सहकार्य करण्यास तयार आहोत, अशी ग्वाही चिखलीच्या लोकप्रिय आमदार तथा भारतीय जनता पक्षाच्या नेत्या श्वेताताई महाले पाटील यांनी दिली. चिखली येथील खंडाळा रोड वायझडी तलावाजवळील तालुक्यातील एकमेव अशा सृष्टीचे रचियता प्रभू विश्वकर्मा यांच्या मंदीरस्थळी प्रभूविश्वकर्मा प्रगटदिन व उद्योगदिन सोहळा पार पडला. या सोहळ्याच्या प्रमुख अतिथीम्हणून त्या बोलत होत्या. याप्रसंगी नियोजित विश्वकर्मा भवनाचे भूमिपूजनही त्यांच्याहस्ते पार पडले.

या कार्यक्रमाला विवेकानंद आश्रमाचे उपाध्यक्ष अशोकभाऊ थोरहाते, विश्वकर्मा बहुउद्देशीय सेवा समितीचे मार्गदर्शक तथा ज्येष्ठ सामाजिक विचारवंत दयानंद थोरहाते सर, सुतार समन्वय समितीचे जिल्हाध्यक्ष डॉ. विजय खोलाडे, संत भोजलिंगकाका चरित्राचे अभ्यासक प्रा.विजय रायमल, डॉ.विजय खोलाडे, ज्येष्ठ साहित्यिक प्रा. संजय भारती सर आदी मान्यवरांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
आ.श्वेताताई महाले पाटील म्हणाल्या, की सुतार समाज बांधवांना जे लागेल ते सहकार्य आपण करू. विश्वकर्मा भवनाबाबत शासकीय कागदपत्रे पूर्ण झाली की लगेचच बांधकामाला सुरूवात केली जाईल. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी विश्वकर्मा समाजासाठी प्रभू विश्वकर्मा यांच्या नावाने सन्मान योजना आणली आहे. या योजनेचा जास्तीत जास्त समाज बांधवांनी लाभ घ्यावा, असे आवाहनही याप्रसंगी आ. श्वेताताईंनी केले. याप्रसंगी त्यांच्याहस्ते विश्वकर्मा भवनाचे भूमिपूजन पार पडले, तसेच हळदी-कुंकू स्पर्धेतील पाच भगिनींना लकी ड्रॉमधून पाच पैठणींचे वितरणही करण्यात आले.

याप्रसंगी प्रा. संजय भारती, प्रा. रायमल यांनी समाज बांधवांचे वैचारिक प्रबोधन करून, सुतार समाजाने आधुनिकतेची कास धरून प्रगतीच्या वाटेवर अग्रेसर व्हावे, असे आवाहन केले. युवावर्गाने आपल्या व्यवसायाचे रूपांतर आता उद्योगात करावे, असेही ते म्हणालेत. डॉ. विजय खोलाडे यांनीही उपस्थित कारागीर बांधवांना मार्गदर्शन करून, सुतार समाजाने एकजुटीने वाटचाल केली तर समाज पुढारेल, समाजाची प्रगती होईल, असे सांगितले. कार्यक्रमाचे अध्यक्ष दयानंद थोरहाते यांनीही याप्रसंगी बहुमोल असे मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाची सुरूवात दीपप्रज्वलनाने झाली तर तत्पूर्वी शहरातून युवावर्गाने भव्य अशी प्रभू विश्वकर्मा यांची दुचाकी रॅली काढली होती. तसेच, सकाळी होमहवन व पूजाअर्चादेखील पार पडली. या कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचलन ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’चे पत्रकार विनोद खोलगडे यांनी केले तर माधवराव इंगळे यांनी उपस्थितांचे आभार मानले. या कार्यक्रमानंतर महाप्रसादाचे वितरण करण्यात आले.

श्री विश्वकर्मा बहुउद्देशीय सेवा समिती चिखलीद्वारे समितीचे अध्यक्ष मुकेश सुरूशे व समिती सदस्यांच्यावतीने प्रभू विश्वकर्मा मंदिराची उभारणी तसेच विश्वकर्मा भवन उभारले जात असून, मंदीरस्थळी दरवर्षी प्रभू विश्वकर्मा जयंतीनिमित्त दर्जेदार कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात चिखली तालुका, शहर व जिल्हाभरातून सुतार समाज बांधव आवर्जुन येत असतात. ‎

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page