किरकोळ वादातून दोन गटांत तणावाचे वातावरण
चिखली पोलिस स्टेशनमध्ये आला होता जमाव : ४ जणांवर गुन्हे दाखल
चिखली-आपलं बुलढाणा जिल्हा बातमी :- घरासमोरून बेदरकारपणे बुलेट चालविण्यासह बुलेटमधून कर्णकर्कश फटाक्यांचा आवाज काढण्यावरून चिखलीतील राऊतवाडी परिसरात ३ मार्चच्या रात्री दोन गटांत तणाव निर्माण झाला होता. या घटनेनंतर चिखली पोलिस स्टेशनसमोर मोठा जमाव जमा झाला होता. दरम्यान, या प्रकरणी चार जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
स्थानिक राऊतवाडी चौकातून रात्री पावणेबाराच्या सुमारास बुलेटवरून भरधाव वेगाने व बुलेटच्या सायलेन्सरमधून फटाके वाजवित जाणाऱ्या दानीयल अली खान यास या भागातील गोटू बोराडे, पवन घोरपडे व छोटू खलसे या तिघांनी बुलढाणा रोडवरील एका पेट्रोल पंपावर गाठून जाब विचारला होता. यावरून या ठिकाणी बाचाबाची झाली होती. दरम्यान, याच कारणावरून पुन्हा राऊतवाडी चौकात दोन गटांत बाचाबाची झाली. यामुळे येथे तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी मध्यस्थी करीत हा जमाव पांगविल्याने तणाव निवळला. दरम्यान, ४ मार्च रोजी या प्रकरणी मो. तोहफीक मो. रफीक (२८) याने चिखली पोलिसांत तक्रार
दाखल केली. यामध्ये मो. तोहफीक व जुबेर अली खान हे दोघे जण बुलढाण्याहून चिखलीकडे येत असताना त्यांना दानीयल अली खान हा पेट्रोल पंपावर भेटला असता त्याने राऊतवाडी चौकातून बुलेट जोरात का चालविली म्हणून तिघांनी बाचाबाची केल्याचे सांगितले. त्यास घरी पाठवून तोहफीक व जुबेर हो दोघे जण स्कूटीवरून राऊतवाडी चौकातून घराकडे निघाले असता चौकात उभे असलेल्या गोट्या बोराडे, पवन घोरपडे, छोटू खलसे व एका अनोळखी व्यक्तीने चालत्या गाडीवर अचानकपणे हल्ला चढवून मारहाण केली होते. या प्रकरणी गोट्या बोराडे, पवन घोरपडे, छोटू खलसे व एका अनोळखीवर गुन्हा दाखल केला आहे.