कामगार कल्याण मंडळाच्या स्पर्धेत बुलढाण्याच्या कलावंतांची ऐतिहासिक कामगिरी
एकूण सहा बक्षिसांसह दोन अंकी नाटक "अनपेक्षित" राज्यात प्रथम
बुलढाणा- (आपलं बुलढाणा जिल्हा बातमी )- येथील नाट्यसृष्टीसाठी आजचा दिवस ऐतिहासिक ठरला. महाराष्ट्र राज्य कामगार कल्याण मंडळाच्या ६९ व्या नाट्यस्पर्धेत येथील कलावंतांनी कामगार कल्याण केंद्र चिखलीकडून सादर केलेल्या “अनपेक्षित” या दोन अंकी नाटकाने एकूण सहा बक्षिसांसह राज्यात प्रथम क्रमांक पटकावला. बुलढाणाच्या नाट्य इतिहासात शासनाच्या स्पर्धेत राज्यस्तरीय विजेतेपद मिळविण्याची ही पहिलीच घटना आहे.
महाराष्ट्र राज्य कामगार कल्याण मंडळाच्यावतीने आज ४ मार्च रोजी संध्याकाळी स्पर्धेचा निकाल जाहिर करण्यात आला. नाशिक येथील परशुराम साईखेडकर नाट्यगृहात ८ ते २५ फेब्रुवारी दरम्यान ही स्पर्धा पार पडली. राज्याच्या विविध केंद्रावर प्राथमिक फेरीत विजेत्या ठरलेल्या एकूण १८ नाट्यसंघांनी आपले प्रयोग सादर केले. यामध्ये अकोला विभागातून प्रथम आलेल्या कामगार कल्याण केंद्र चिखलीतर्फे स्थानिक कलावंतांनी शैलेंद्र टिकारीया लिखित व विजय सोनोने दिग्दर्शित अनपेक्षित हे दोन अंकी नाटक २४ फेब्रुवारी रोजी सादर केले. आज जाहीर झालेल्या निकालात टीम अनपेक्षितला एकूण सहा बक्षिसे प्राप्त झाली व राज्यातून प्रथम येण्याचा बहुमान प्राप्त झाला. बक्षिसांमध्ये टीम अनपेक्षितला सांघिक – प्रथम, विजय सोनोने यांना दिग्दर्शन – प्रथम, विराग जाखड यांना प्रकाशयोजना प्रथम, अनिकेत गायकवाड यांना नेपथ्य प्रथम, विजय सोनोने यांना संगीत प्रथम, धनंजय बोरकर यांना उत्तेजनार्थ अभिनय द्वितीय यांचा समावेश आहे. नाट्यसंघात कलावंत म्हणून पराग काचकुरे, पंजाबराव आखाडे, डॉ. स्वप्नील दांदडे, प्रसाद दामले, कल्याणी काळे यांचा समावेश होता. नाट्यसंघाला गणेश देशमुख, लक्ष्मीकांत गोंदकर, अर्चना जाधव, पवन इंगळे, यांनी सहकार्य केले. कामगार कल्याण केंद्र चिखलीचे समन्वयक अनंता मोरे, अमरावती कामगार कल्याण अधिकारी वैशाली नवघरे यांनी विशेष सहकार्य केले.
बुलढाणा जिल्ह्याच्या नाट्यसृष्टीत आजपर्यंतच्या इतिहासात शासनाच्या स्पर्धेत पहिल्यांदाच राज्यस्तरीय विजेतेपद अनपेक्षितच्या माध्यमातून प्राप्त झाले असल्याने टीम अनपेक्षितचे विविधस्तरातून अभिनंदन होत आहे. बक्षिस समारंभ लवकरच मुंबई येथे आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती कामगार कल्याण मंडळाच्यावतीने देण्यात आली.