वृद्ध महिलेची आर्थिक फसवणूक, पिता, पुत्रावर गुन्हा दाखल
साखरखेर्डा- आपलं बुलढाणा जिल्हा बातमी : बेसहारा वृद्ध महिलेची आर्थिक फसवणूक, अश्लील व जातिवाचक शिवीगाळ आणि विनयभंग करून जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी साखरखेर्डा पोलिसांनी मलकापूर पांग्रा येथील दोन आरोपींविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले आहेत. मलकापूर पांग्रा येथील साबेरखा सुलतानखा पठाण व जावेदखा साबेरखा पठाण अशी याप्रकरणातील आरोपींची नावे आहेत. प्रकरणातील पीडित ७० वर्षीय महिलेने याप्रकरणी तक्रार दिली होती. ६ नोव्हेंबर २०२३ ते १६ फेब्रुवारी २०२४ दरम्यानची ही घटना होती.
याप्रकरणी पोलिसांनी ३ मार्च रोजी पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. साबेरखा याने पीडित महिलेकडून साक्षीदार समाधान राधाकिसन सोनुने याच्या नावे एक एकर ९ गुंठे शेती खरेदी खत करून घेत समाधान सोनुने याच्याकडून ४ लाखांचा धनादेश स्वतः सह मुलगा जावेद खा यांच्या नावे घेत वटविला होता. तक्रारकर्त्या महिलेस पैसे न देता पीडिता व साक्षीदार यांची साडेतीन लाख रुपयांनी फसवणूक केली.
पीडिता तथा तक्रारदार महिला ही बेसहारा असून तिच्या पतीचे निधन झालेले आहे. मुलबाळ होत नसल्याने आरोपींनी तिच्या एकटेपणाचा गैरफायदा घेत अश्लील व जातिवाचक शिवीगाळ करून जिवे मारल्याची धमकी दिल्याचेही तक्रारीत नमूद आहे. त्यावरून ठाणेदार स्वप्निल नाईक यांनी आर्थिक फसवणूक, धमकी, जातीवाचक शिवीगाळ यासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. प्रकरणाचा पुढील तपास मेहकरचे उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदीप पाटील हे करीत आहेत.