घाटपुरी येथील युवकाची नांदुऱ्यात केली हत्या
पेट्रोलपंपानजीक आढळला होता मृतदेह
खामगाव:- आपलं बुलढाणा जिल्हा बातमी- नांदुरा शहरापासून नजीकच असलेल्या मोताळा रोडवरील एका पेट्रोलपंपानजीक २ मार्च रोजी मृतावस्थेत आढळून आलेल्या युवकाची ओळख पटली आहे. तो घाटपुरी येथील हर्षल उर्फ पप्पू सदाशिव घोपे असल्याचे निष्पन्न झाले असून, या प्रकरणातील आरोपी अद्याप फरार असल्याचे समजते. प्राप्त माहितीनुसार, मोताळा रोडवरील माउली पेट्रोल पंपाजवळील लोणवाडी शेतशिवारातील शेताच्या धुऱ्यावर एक युवक मृतावस्थेत दोन मार्च रोजी आढळून आला. मृतकाचा चेहरा विद्रुप तसेच त्याच्या डोक्यावर मारल्याचे व्रण आढळले होते. गळा आवळून खून झाल्याचेही प्रथमदर्शनी समोर आले होते. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती.
दरम्यान, नांदुरा पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला. अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला. युवकाचे छायाचित्र प्रसिद्धी तसेच समाज माध्यमात प्रसिद्ध केले. माहिती समजल्यानंतर मृतकाचा भाऊ अभिषेक घोपे याने सोमवार ४ मार्च रोजी रात्री नांदुरा पोलिस स्टेशनमध्ये मृतक युवक हा आपला भाऊ असल्याची माहिती पोलिसांना दिली. त्यावरून पोलिसांनी हर्षल उर्फ पप्पू सदाशिव घोपे याचा मृतदेह त्यांच्या ताब्यात दिला. युवकाच्या हत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. याप्रकरणी नांदुरा पोलिस कसून चौकशी करीत आहेत.