अवैध सागवान प्रकरणात आणखी एकास अटक
एक लाख ३६ हजारांचा मुद्देमाल जप्त, आरोपीस एका दिवसाची वनकोठडी
मोताळा :- आपलं बुलढाणा जिल्हा बातमी- तालुक्यातील गोतमारा शिवारातील अवैध सागवान प्रकरणात वनविभागाच्या पथकाने तिघांना जेरबंद केले होते. याच गुन्ह्यात १२ मार्च रोजी आणखी एका आरोपीला अटक करण्यात आली असून, त्याच्या ताब्यातून १ लाख ३६ हजार ५९७ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या आरोपीला १३ मार्च रोजी मोताळा न्यायालयात हजर केले असता, त्याला एका दिवसाची वनकोठडी मिळाली आहे.
गोतमारा शिवारात अवैधरीत्या सागवानची वाहतूक होत असताना, बुलडाणा डीएफओ सरोज गवस यांच्या मार्गदर्शनात बुलडाणा आरएफओ अभिजीत ठाकरे, पाडळी वर्तुळ अधिकारी स्वप्निल वानखेडे यांच्या पथकाने आरोपी सुभाष वसंता चव्हाण (रा. गोतमारा), अनिल प्रल्हाद सपकाळ(रा. हनवतखेड), मनोहर दशरथ तायडे या तिघांना २१ फेब्रुवारी रोजी अटक केली होती. त्यांच्या ताब्यातून १० लाख ६७ हजार ४०० रुपये किमतीचे एकूण १४.४०० घनमीटर सागाची लाकडे जप्त करण्यात आली होती. तिघा आरोपींना २२ फेब्रुवारी रोजी एका दिवसाची वनकोठडी मिळाली होती. वनविभागाच्या पथकाने त्यांची कसून चौकशी केली असता, या गुन्ह्यात आणखी एक आरोपी निष्पन्न झाला. दरम्यान, वनविभागाच्या पथकाने आरोपी साहेबराव श्रीनाथ इतवारे याला १२ मार्च रोजी बुलडाणा येथून अटक केली. त्याच्या ताब्यातून १ लाख ३६ हजार ५९७ रुपये किमतीची १.५१४ घनमीटर सागाची लाकडे इजलापूर (ता. बुलडाणा) येथून जप्त करण्यात आली. या आरोपीला १३ मार्च रोजी मोताळा न्यायालयाने एका दिवसाची वनकोठडी सुनावली. चौघांकडून आतापर्यंत १२ लाखांचा मुद्देमाल जप्त या गुन्ह्यात चौघा आरोपींकडून आतापर्यंत एकूण १२ लाख ३ हजार ९९७ रुपये किमतीची अवैध सागवानाची चौरस व गोल लाकडे जप्त करण्यात आली आहे. ही कारवाई उपवनसंरक्षक सरोज गवस यांच्या मार्गदर्शनात वनरक्षक पी.पी. मुंढे, बी.ए. घुले, विक्रम राऊत, एम.जी. बोरकर, प्रवीण सोनुने, संदीप मडावी यांच्या पथकाने केली. या गुन्ह्यात आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे. पुढील तपास वनपाल स्वप्निल वानखेडे हे करीत आहे.