ट्रक व कार अपघातात मेहकर येथील अॅड. विजय बाजड यांचा मृत्यू
मेहकर- आपलं बुलढाणा जिल्हा बातमी- गॅस सिलेंडरची वाहतूक करणारा ट्रक व क्रिएटा कार यांची समोरासमोर धडक लागून झालेल्या अपघातात मेहकर येथील प्रसिध्द विधीज्ञ अॅड. विजय हिंमतराव बाजड (वय ४०) हे ठार झाले. सदर अपघात मेहकर चिखली रस्त्यावरील लव्हाळापासून जवळच असलेल्या माळखेड फाटा येथे बुधवारी दुपारी १२:३० च्या सुमारास घडला. अॅड. बाजड यांची नुकतीच भाजपाच्या विधी सेलच्या राज्य उपाध्यक्षपदी नियुक्ती झाली होती. अॅड. विजय बाजड हे मेहकर, बुलढाणा तसेच नागपूरच्या उच्च न्यायालयात वकील व्यवसाय करीत होते. बुधवारी सकाळी बुलढाणा येथून ते एकटेच एम.एच.-२८ बी. के. या क्रिएटा या चार चाकी गाडीने मेहकर कडे येत असतात माळखेड फाट्याजवळ बुलढाणाकडे गॅस सिलेंडरचे वाहतूक करणाऱ्या ट्रक क्र. एम.एच. ३७-टी १८२० ची समोरासमोर जोरदार धडक बसली. या अपघातात अॅड. बाजड यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांना ताबडतोब चिखली येथे खासगी दवाखान्यात उपचारार्थ दाखल करण्यात आले. मात्र त्या ठिकाणी त्यांची प्राणज्योत मालवली.
सदर अपघात एवढा भीषण होता की गाडीचा समोरील भाग चकनाचुर झाला आहे. अॅड. बाजड यांच्या पश्चात, न्यायाधीश असलेले भाऊ अनंत बाजड, आई, पत्नी, मुलगा, मुलगी असा आप्त परिवार आहे. अत्यंत कष्टातून शिक्षण घेत अॅड. बाजड यांनी जिल्हाभरात नावलौकिक मिळविला होता. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विदर्भ प्रांताच्या धर्म जागरण विभागाचे काम ही त्यांनी सांभाळले होते. त्यांच्या अकाली निधनाने सामाजिक, राजकीय क्षेत्रातून संवेदना व्यक्त होत आहेत. दरम्यान लव्हाळा फाट्याजवळ ९ मार्च रोजी आयशर आणि कारच्या अपघातात १ ठार व ३ जण गंभीर जखमी झाले होते.