चिखलीत पोलिसांनी दुचाकी चोरट्यांना ठोकल्या बेड्या…
दोन दुचाकीही केल्या जप्त
चिखली- आपलं बुलढाणा जिल्हा बातमी :- शहर व परिसरात दुचाकी चोरीचे प्रमाण वाढले आहे. या अनुषंगाने दाखल तक्रारींची गंभीरतेने दखल घेत चिखली पोलिसांनी शेख शाहरुख शेख इस्माईल (रा. गौरक्षणवाडी) व गणेश राजू भालेराव (रा. भीमक्रांती नगर चिखली) या दोन चोरट्यांना ताब्यात घेत त्यांच्याकडून चोरीच्या दोन दुचाकी जप्त केल्या आहेत.
स्थानिक सहारा पार्क मधील अण्णा शंकर डुकरे यांची ४ फेब्रुवारीच्या रात्री घरासमोर उभी केलेली दुचाकी चोरीला गेली होती. याबाबत पोलिसांमध्ये त्यांनी तक्रार दाखल केली होती. यापृष्ठभूमीवर ठाणेदार संग्राम पाटील यांनी पोलिस उपनिरीक्षक सचिनसिंह चौहान, महिला पोलिस हवालदार शांता मगर, पोलिस अंमलदार ज्ञानेश्वर शिंदे, पंढरी मिसाळ व प्रशांत धंदर यांचे पथक तयार करुन तपासकामी लावले होते. सदर पथकाने गोपनीय व तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपी शेख शाहरुख शेख इस्माईल व गणेश राजू भालेराव यांना अटक केली. न्यायालयाने त्यांना तीन दिवसांचा पीसीआर दिला होता. यादरम्यान आरोपींनी चोरीची कबुली दिल्यानंतर त्यांच्याकडन राजर (जि. जालना) येथन एमएच २८-एआर- ४४५० व एमएच १६ सीबी ३२१२ डिलक्स अशा दोन दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. तपासादरम्यान सदर आरोपींनी पुणे व बुलढाणा शहरासह इतरही ठिकाणी चोरी केल्याबाबत माहीती दिली असल्याने अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.