विनापरवानगी डीजे वाजविल्यास आता पोलिस करणार कठोर कारवाई…
बुलढाणा शहर पोलिस स्टेशन येथे सर्व समाजबांधव यांची शांतता कमिटीची बैठक संपन्न
आपलं बुलढाणा जिल्हा बातमी – बुलढाणा:- सद्यस्थितीत लग्न सराईची धूम सुरू असल्याने त्यात विनापरवाना डीजे वाजविण्यात येत आहेत. आगामी काळात लग्न व ईतर मिरवणुकीत विनापरवाना डीजे वाजविल्यास कठोर कारवाईचा इशारा बुलढाणा शहर पोलिस स्टेशनचे पोलिस निरिक्षक श्री ठाकरे यांनी दिला आहे. दि. २८ एप्रिल रोजी बुलढाणा शहर पोलिस स्टेशन येथे सर्व समाजबांधावाची बैठक घेण्यात आली आहे. या मध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्हा पोलिस अधिक्षक श्री सुनिल कडासने यांच्या मार्गदर्शनाखाली हि मोहिम सुरू करण्यात आली आहे. लग्न आणि वरातीच्या मिरवणुकीत संवेदनशील ठिकाणी विनाकारण थांबवून कर्कश आवाजात डीजेच्या वाद्यावर आक्षेपार्ह गाणे वाजविल्या जात आहेत. त्यामुळे दोन समाजामध्ये वाद निर्माण होऊन कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे. मिरवणूक मध्ये सुध्दा मोठ्या प्रमाणात डिजे वाजविले जात आहे. बुलढाणा शहरात गेल्या १४ एप्रिल रोजी मोठी घटना घडली आहे. एक तरूणाची निघृण हत्या करण्यात आली आहे. डिजे आला म्हणजे दारू आली आणि नशेत काय करतील हे काही सांगता येत नाही त्यामुळे या गोष्टीला कुठे तरी आळा बसायला हवा. त्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. लग्न समारंभात डिजे वाजविण्यासाठी आता बुलढाणा शहर पोलिस स्टेशन येथू परवानगी काढण्यात येणार आहे. विनापरवानगी कोणी डिजे वाजविल्यास त्याच्या कठोर कारवाई होणार आहे. त्या अनुषंगाने लग्न, वरात तसेच इतर कोणत्याही मिरवणुकीत कुणीही विनापरवाना डीजे वाद्यांचा वापर करू नये, असे आवाहन बुलढाणा शहर पोलिस स्टेशनचे ठाणेदार श्री ठाकरे यांनी केले आहे. या बैठकला बुलढाणा शहरातील सर्व समाज बांधव उपस्थितीत होते.