Homeबुलढाणा घाटाखाली
ट्रक व प्रवासी वाहन अपघातात एक ठार
- आपलं बुलढाणा जिल्हा बातमी- मलकापूर : भरधाव ट्रक व प्रवासी वाहनाची समोरासमोर धडक झाल्याच्या अपघातात प्रवासी वाहन चालकाचा मृत्यू झाला, तर ४ चार जण जखमी झाले. राष्ट्रीय महामार्ग ५३ वर तांदुळवाडी पुलानजीक बुधवारी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला.यासंदर्भात अधिक माहिती अशी की, ट्रक क्रमांक आरजे-११, जीबी ४९९७ मलकापूरकडून मुक्ताईनगरकडे जात होता. तर प्रवासी वाहन क्रमांक एमएच-१५, डीसी-९७१२ मुक्ताईनगरकडून मलकापूरकडे येत होते. दरम्यान, दोन वाहनांची जोरदार धडक झाली. या धडकेत वाहन चालक गोरख सुरेश मोहिते (३२), सप्तशृंगी गड, नाशिक हा गंभीररीत्या जखमी झाला, तर सुधाकर शालिग्राम धामोडे (७२, सप्तश्रृंगी गड), ऐश्वर्या उमेश बेलोकर (२०, नाशिक), आर्या मोहन गुरगुले (१४, नाशिक), प्रिया संतोष उन्हाले (४०, मुंबई) असे एकूण चार जण जखमी झाले.
या घटनेची माहिती कळताच शिवसेना तालुका प्रमुख विजय साठे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष राजू साठे, वीटभट्टी मालक भाई, धनराज पाटील, वासुदेव जोगी आदींनी तातडीने घटनास्थळाकडे धाव घेतली. टोल नाक्यावरील रुग्णवाहिकेला तातडीने पाचारण करण्यात आले आणि जखमींना वाहनातून बाहेर काढून उपजिल्हा रुग्णालयाकडे रवाना केले.उपचारादरम्यान गंभीर जखमी असलेला चालक गोरख मोहितेचा मृत्यू झाला. इतर चार जखमींवर उपचार सुरू आहेत. या अपघातात वाहनांचाही चुराडा झाल्याचे दिसून आले. वाहनातील सर्व प्रवासी सप्तशृंगी गडावरून नांदुराकडे जात होते.