अपघातामध्ये दुचाकीस्वारांचा मृत्यू अधिक परिवहन विभाग उपाययोजना करणार
बुलडाणा – आपलं बुलढाणा जिल्हा बातमी: जिल्ह्यातील अपघाताच्या आकडेवारीमध्ये दुचाकीस्वारांचा मृत्यू होण्याचे प्रमाण अधिक आहे. हे प्रमाण कमी करण्यासाठी परिवहन विभागातर्फे विविध उपाययोजना करण्यात येणार आहे. यात प्रामुख्याने हेल्मेटचा वापराची सक्ती करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येणार आहे. गेल्या जानेवारी ते डिसेंबर 2023 मध्ये एकूण 628 अपघात झाले आहेत. यातील 308 अपघातात 387 मृत्यू झाले आहे. यावर्षी जानेवारी ते मार्च 2024 या तीन महिन्याच्या कालावधीत 192 अपघात झाले असून 101 जणांचा मृत्यू झाला आहे. 192 अपघातांमध्ये सर्वाधिक 83 अपघात दुचाकीचे झाले आहेत. तसेच 34 चारचाकी वाहन, 69 जड वाहने, 6 तीनचाकी वाहनांचा अपघात झाला आहे. गेल्या वर्षीच्या तीन महिन्याच्या तुलनेत यावर्षी 39 अपघात, तर 21 मृत्यू वाढले आहेत.टिप्परच्या धडकेने मृत्यू होत असल्याने टिप्परची तातडीने तपासणी करावी. याबाबत सातत्याने कार्यवाही करण्यात यावी. विना क्रमांकाच्या टिप्परवर तातडीने कार्यवाही करावी. अपघात रोखण्यासाठी गतिरोधक, माहितीसाठी फलक, वेगमर्यादेचे नियंत्रण असणे गरजेचे आहे. यासाठी बांधकाम विभागाने मोहिम घेऊन गतीरोधकांवर पांढऱ्या पट्ट्या आखाव्यात, रस्त्याच्या कडेला फलक लावून संदेश देण्यात यावे. तसेच फलकावर मदतीसाठी पोलिस, रुग्णालयाचे संपर्क क्रमांक. जवळच्या रुग्णालयाची माहिती देण्यात यावी. अपघात प्रवण क्षेत्रात सूचना देणारे फलक लावण्यात यावे. तसेच रस्ता सुरक्षेसाठी उजव्या बाजूने चालावे, यासाठी जनजागृती करण्यात येणार आहे.
दुचाकीच्या वाढत्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर परिवहन विभागातर्फे विविध उपाययोजना करण्यात येणार आहे. यात सुरवातीला एक महिना हेल्मेट वापरासंबंधी जनजागृती करण्यात येणार आहे. त्यानंतर प्रत्यक्ष कारवाई करण्यात येणार आहे. यासोबतच वेगमर्यादा पाळणे, रस्त्याच्या उजव्या बाजूने चालणे, मादक पदार्थाचे सेवन करून वाहन चालवू नये याबाबत जनजागृती करण्यात येणार आहे.जिल्ह्यातील अपघातामध्ये दुचाकीचे अपघात होण्याचे प्रमाण अधिक आहे. अपघातात घरातील कर्त्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास कुटुंब उध्वस्त होते. तसेच महिलांवर जबाबदारी येते. त्यामुळे दुचाकी चालकांनी स्वत: आणि कुटुंबाच्या संरक्षणासाठी हेल्मेट वापरावे. दुचाकी चालविताना मोबाईलचा वापर टाळून बेकदारपणे वाहन चालविणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.