बुलढाणा- आपलं बुलढाणा जिल्हा बातमी:- बुलडाणा येथील कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने शुक्रवारी, दि. 17 मे रोजी एक दिवसीय आंबा महोत्सव आयोजित केला आहे. या महोत्सवात आंबा प्रदर्शनी आणि विक्री करण्यात येणार आहे. नागरिकांनी या महोत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.कृषी विज्ञान केंद्र नाविन्यपूर्ण कृषी तंत्रज्ञानाचा विस्तार करण्याचे कार्य विविध माध्यमातून करीत आहे. जिल्ह्यातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांना आंबा उत्पादनासाठी वाव मिळावा आणि आंबा प्रेमींना विविध जातींच्या आंब्याची चव चाखता यावी, यासाठी अजिंठा रस्त्यावरील कृषि विज्ञान केंद्रामध्ये कृषि विज्ञान केंद्र, कृषि विभाग आणि आत्माच्या वतीने सकाळी 9 वाजता आंबा महोत्सव, प्रदर्शनी व विक्रीचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्याकडील आंबा सदर महोत्सवात विनाशुल्क विक्रीसाठी ठेवता येईल.
आंबा महोत्सवाचे उद्घाटन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांच्या हस्ते होणार आहे. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख अध्यक्षस्थानी राहतील. प्रमुख पाहुणे म्हणून विस्तार शिक्षण संचालक डॉ. धनराज उंदिरवाडे, संशोधन संचालक डॉ. विलास खर्चे, कृषी अधिष्ठाता श्यामसुंदर माने, उद्यानविद्या अधिष्ठाता डॉ. देवानंद पंचभाई, कृषी अभियांत्रिकी अधिष्ठाता डॉ. सुरेंद्र काळपांडे उपस्थित राहणार आहेत.तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब मोहन, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मनोजकुमार ढगे, आत्माचे प्रकल्प संचालक पुरुषोत्तम उन्हाळे, कृषी संशोधन केंद्राचे प्रमुख डॉ. दिनेश कानवडे, कृषी तंत्र विद्यालयाचे प्राचार्य डॉ. सतीशचंद्र जाधव, माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी सुमेध तायडे उपस्थित राहणार आहेत.
महोत्सवात स्थानिक आंबा जातींची ओळख, आंबा फळाच्या विविध वाणांची प्रदर्शनी व विक्री, आंबा लागवड व व्यवस्थापनासाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन आणि आंब्याच्या वाणांची कलम विक्री, तसेच आंब्यापासून बनविलेले विविध प्रक्रिया पदार्थ विक्रीसाठी उपलब्ध राहणार आहेत. महोत्सवात शेतकरी आणि नागरिकांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन कृषि विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख डॉ. अनिल तारू यांनी केले आहे.