टंचाईग्रस्त गावातील जलनमुने घेण्याचे जिल्हाधिकारी यांचे निर्देश
बुलढाणा- आपलं बुलढाणा जिल्हा बातमी : जिल्ह्यात उद्भवलेल्या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर टँकर आणि अधिग्रहित खासगी विहिरीद्वारे पाणीपुरवठा करण्यात येणाऱ्या जिल्ह्यातील २२५ गावांतील पाणी नमुने घेण्याचे निर्देश पंचायत समित्यांना देण्यात आले आहे. जिल्ह्यात जलजन्य आजारांचा प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीने उपाययोजना करण्यात येत आहे.
नुकतीच जिल्हाधिकारी किरण पाटील यांनी संभाव्य साथरोग प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य विभागाची बैठक घेतली होती. त्यामध्ये त्यांनी विविध उपाययोजना सुचविल्या होत्या. सोबतच टँकर व विहिरीद्वारे पाणीपुरवठा करण्यात येणाऱ्या गावातील पाणी नमुने घेण्याचे निर्देशही दिले होते. त्या अनुषंगाने आता जिल्हा परिषदेचा आरोग्य सतर्क झाला आहे. विभागाने सर्व पंचायत समित्यांच्या ‘बीडीओ’ना तसे लेखी आदेश दिले. टँकर व नेहमीपेक्षा वेगळ्या विहिरीद्वारे पाणी पुरवठा होत असलेल्या गावांतील पाणी नमुने घेण्याचे त्यात स्पष्ट करण्यात आले.१ लाख ६० हजार ग्रामस्थांची टँकरवर मदार जिल्ह्यात पाणीटंचाईची दाहकता वाढली आहे. ७ तालुक्यांतील ५४ गावांना ५५ टैंकर द्वारे पाणीपुरवठा होत आहे. इतर जलस्रोत अपुरे पडत असल्याने १ लाख ५८ हजार ५३४ ग्रामस्थांना तहान भागविण्यासाठी टैंकर व अधिग्रहीत विहिरींचाच पर्याय उरला आहे. देऊळगाव राजात ११ गावांना, चिखलीत १२, बुलढाण्यात १३, मेहकरमध्ये ९, सिंदखेड राजात ३, लोणारमध्ये २, तर मोताळ्यात ४ गावांना ५ टँकरद्वारे पाणीपुरवठा होत आहे. खासगी विहिरीद्वारे होणाऱ्या पाणीपुरवठ्यावर अवलंबून राहावे लागत असल्याने ग्रामीण भागात पाण्यासाठी ग्रामस्थांचे हाल होत आहे. ८ तालुक्यांतील १७१ गावांसाठी २०३ खासगी विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहे. यामुळे ग्रामस्थांच्या आरोग्यासाठी पाण्याचे नमुने तपासणी गरजेचे आहे. साथरोगांचा उद्रेक टाळण्याच्या दृष्टीनेही पाणी तपासणी गरजेचीच आहे.