स्त्यावर पडलेल्या वाळूमुळे दुचाकी स्वाराचा अपघात , शेतकऱ्यांनी स्वताच्या हाताने केली रस्त्याची सफाई
साखरखेर्डा – आपलं बुलढाणा जिल्हा बातमी- समाधान सरकटे- रात्रीच्यावेळी सुसाट वेगाने धावणाऱ्या वाळू वाहतूकीमुळे मलकापूर पांग्रा ते साखरखेर्डा यासह अनेक रस्त्यावर वाळू पसरली असून वाळूच्या बारीक कणावर मोटारसायकल चालविणे कठीण झाले आहे . यातच अनेक अपघात होत असून अशीच घटना आज गोरेगाव ते पांग्रीकाटे रस्त्यावर घडली . त्या अपघातात दोन जखमी झाले आहेत .
सिंदखेडराजा तालुक्यातील साखरखेर्डा , गोरेगाव ते पांगरीकाटे या रोडवर अनेक गतिरोधक आहेत काही आवश्यक आहेत . परंतु या गतिरोधक वर रंगीत पट्टे न मारल्यामुळे अनेक वाहनधारकांना याचा पत्ता लागत नाही . रात्री ११ वाजेनंतर खडकपुर्णा नदीपात्रातून अवैध वाळू उपसा करून वाळू वाहतूक करणारे टिप्पर सुसाट वेगाने धावतात . डिग्रस येथून ही वाहने , वाकद , डोरव्ही , मलकापूर पांग्रा , शेंदुर्जन, या मार्गे साखरखेर्डा तर दुसरा मार्ग सावखेडनागरे , मेरा बु . दरेगाव येथून शेंदुर्जन , तिसरा मार्ग मेरा बु . , शिंदी , साखरखेर्डा , लव्हाळा असा हा वाहतुकीचा मार्ग आहे . साखरखेर्डा येथून ठराविक एजंट मार्फत वाळू पुरविल्या जाते . ही वाहतूक सुरु असताना त्या वाहनातील रेती सडा पडावा अशी पडलेली असते . गतिरोधकावरुन सुसाट वेगाने वाहन जात असताना मोठ्या प्रमाणात रेती खाली पडते .अशा ठिकाणी मोटारसायकल चालकांना अंदाज येत नसल्याने रेतीवरुन वाहन घसरुन अपघात घडत आहेत . १४ मे रोजी गोरेगाव फाट्यावर आणि गोरेगाव ते काटेपांग्री रस्त्यावर अपघात झाल्याने एक महिला व पुरुष जखमी झाले . शेतकरी भिकाजी पंचाळ यांनी लागलीच दोघांना दवाखान्यात पाठवून रस्त्यावरील रेती बाजूला केली . ज्या ठिकाणी गतीरोधक आहेत त्या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाने पांढरे पट्टे मारुन अपघाताची मालिका थांबवावी अशी मागणी ग्रामस्थ लोक करित आहे.